अडवाणींना 'भारतरत्न', मोदी यांची ‘एक्स’वरून घोषणा : देशभरातून अभिनंदन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर ट्विट करत याची घोषणा केली.
अडवाणींना 'भारतरत्न', मोदी यांची ‘एक्स’वरून घोषणा : देशभरातून अभिनंदन

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर ट्विट करत याची घोषणा केली. अडवाणी यांच्या भारतीय राजकारणातील योगदानाबद्दल या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लालकृष्ण अडवाणी यांचे देशभरातून अभिनंदन होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्याचे सांगत आपल्याला आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. मी लालकृष्ण अडवाणी यांच्याशी फोनवरून संवाद साधला असून त्यांना भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती दिल्याचे मोदी म्हणाले.

१९५१ मध्ये जनसंघाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या अडवाणी यांनी भाजपच्या स्थापनेपासून सर्वाधिक काळ पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. १९८० मध्ये भाजपच्या स्थापनेत त्यांचे मोठे योगदान होते. भाजपच्या स्थापनेनंतर ते १९८६ मध्ये पहिल्यांदा पक्षाचे अध्यक्ष बनले. १९८६ ते १९९० पर्यंत ते अध्यक्ष होते. १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या कालावधीतही त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम केले. अडवाणी हे ५ वेळा लोकसभेत, तर ४ वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. खासदार म्हणून ते जवळपास तीन दशके संसदीय राजकारणात सक्रिय होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अडवाणी यांनी १९९९ ते २००४ मध्ये उपपंतप्रधानपद भूषवले होते. त्यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ मध्ये स्वातंत्र्यपूर्व भारतातील सिंध प्रांतात झाला होता. त्यांनी कराचीतील सेंट पॅट्रिक्स स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले. राजस्थानमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम केले. १९५७ मध्ये अडवाणी राजस्थान सोडून दिल्लीत आले. दिल्लीत तीन वर्ष काम केल्यानंतर अडवाणी पत्रकार म्हणून काम करू लागले. त्यांनी संघाच्या ‘ऑर्गनायझर’मध्ये सहाय्यक संपादक म्हणून काम केले. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २ जागांवर विजय मिळाला होता. त्यानंतर अडवाणींकडे पक्षाची जबाबदारी आली. त्यानंतर ‘रथयात्रा’ काढून देश ढवळून काढला. त्यातून देशभरात भाजपचा झंझावात निर्माण झाला. राजकारणात अडवाणी यांनी ‘यात्रा’ संस्कृती सुरू केली. अयोध्येत राम मंदिराची मागणी सर्वोच्च स्तरावर होती. तेव्हा अडवाणी यांनी ‘सोमनाथ ते अयोध्या’ ही रथयात्रा सुरू केली. त्यातून देशाच्या राजकारणात हिंदुत्वाचे राजकारण सुरू झाले. बिहारमध्ये मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी अडवाणी यांना समस्तीपूर येथे अटक केली. त्यानंतर अडवाणी व लालूप्रसाद यादव हे दोघेही राजकारणातील हिरो बनले.

राजकारणातील समर्पणाचे प्रतीक -राजनाथ सिंह

अडवाणी हे राजकारणातील समर्पण, दृढ संकल्पाचे प्रतीक आहेत. ते आमच्या सर्वांसाठी प्रेरणास्रोत असून ते देशाचे सर्वात वरिष्ठ नेते आहेत. त्यांना ‘भारतरत्न’ देण्याचा निर्णय हा आनंदाची अनुभूती आहे, असे भाजप नेते राजनाथ सिंह यांनी सांगितले.

देशाच्या पुनर्निर्माणात मोठी भूमिका -नितीन गडकरी

देशातील सर्वोच्च नेते व मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळण्याची घोषणा सुखद व आनंददायी आहे. स्वातंत्र्यानंतर अडवाणी यांची देशाच्या पुनर्निर्माणात मोठी भूमिका होती, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती -शरद पवार

"लालकृष्ण अडवाणी हे अनेक वर्ष देशाच्या संसदेत होते. ते दिल्लीतून निवडूनही गेले होते. एखाददुसरा अपवाद सोडला तर त्यांचा कधी पराभव झाला नाही. सार्वजनिक जीवनात स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता", अशा शब्दांत शरद पवार यांनी अडवाणी यांचे कौतुक केले आहे.

अडवाणी हे देशाचे लोहपुरुष -फडणवीस

"अडवाणी हे खऱ्या अर्थाने देशाचे लोहपुरुष राहिलेले आहेत. ६० ते ७० वर्षांच्या कालावधीत राजकारण केले. तरीही ते निष्कलंक राहिले. हे खासकरून लक्षात घेतले पाहिजे. त्याबरोबरच त्यांचा अभ्यास व व्यासंग खूप आहे. आपण त्यांचे विचार ऐकले किंवा संघर्ष जाणून घेतला, तर त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढतो. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वाला भारतरत्न मिळाला ही खूपच समाधानाची बाब आहे," अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

देशाच्या विकास मोलाचे योगदान -पंतप्रधान नरेंद्र मोदी

“मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाला आहे. मी त्यांच्याशी बोललो आणि हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. आपल्या काळातील एक अत्यंत आदरणीय असे मुत्सद्दी राजकारणी असलेल्या अडवाणी यांचे भारताच्या विकासातील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. अगदी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात झाली आणि तो आलेख, देशाचे उपपंतप्रधान होण्यापर्यंत उंचावत गेला. गृहमंत्री आणि माहिती-प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याची छाप सोडली होती. संसदेतील चर्चेदरम्यान त्यांचे वर्तन आणि त्यांची भाषणे, अनुकरणीय तसेच अत्यंत समृद्ध अशी दृष्टी देणारी होती.

logo
marathi.freepressjournal.in