भोजशाळा मंदिर की मशीद? शास्त्रीय पाहणी अहवाल सादर

भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) वादग्रस्त भोजशाळा-कमाल मौला मशीद संकुलाबाबतचा आपला शास्त्रीय अहवाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर पीठासमोर सोमवारी सादर केला.
भोजशाळा मंदिर की मशीद? शास्त्रीय पाहणी अहवाल सादर
Indore HC | Wikimedia
Published on

इंदूर : भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) वादग्रस्त भोजशाळा-कमाल मौला मशीद संकुलाबाबतचा आपला शास्त्रीय अहवाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर पीठासमोर सोमवारी सादर केला.

एएसआयचे वकील हिमांशु जैन यांनी जवळपास दोन हजार पानांचा हा अहवाल उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे सादर केला असून २२ जुलै रोजी त्यावर उच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे.

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील भोजशाळा मंदिर आहे की मशीद या प्रश्नाचे उत्तर शोधणासाठी ९८ दिवस शास्त्रीय सर्वेक्षण करण्यात आले होते. सदर अहवाल प्रसारमाध्यमांना न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वेक्षण आणि उत्खननादरम्यान सापडलेले १७०० हून अधिक पुरावे आणि अवशेष यांचा उल्लेख अहवालामध्ये आहे. हिंदू समाजाने भोजशाळा हे वाग्देवीचे मंदिर असल्याचा दावा केला आहे, तर मुस्लिमांनी ती कमाल मौला मशीद असल्याचे म्हटले आहे. ‘एएसआय’च्या आदेशानुसार हिंदू दर मंगळवारी तेथे पूजा करतात, तर मुस्लिम दर शुक्रवारी तेथे नमाज अदा करतात.

सुप्रीम कोर्ट सुनावणीस तयार

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी भोजशाळेच्या शास्त्रीय सर्वेक्षणावर सुनावणी घेण्याचे मान्य केले आहे. मौलाना कमालुद्दीन वेल्फेअर सोसायटीने भोजशाळेच्या शास्त्रीय सर्वेक्षणाच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आ‌व्हान दिले आहे. ‘एएसआय’ने आपला अहवाल सादर केल्याचे सांगितल्यानंतर न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. एस. व्ही. एन. भट्टी यांच्या पीठाने त्यावर सुनावणी घेण्याचे मान्य केले.

logo
marathi.freepressjournal.in