'गामिनी'ने केला ६ पिल्लांना जन्म देण्याचा विक्रम

भारतात चित्त्यांच्या संवर्धनासाठी 'प्रोजेक्ट चित्ता' सुरु करण्यात आला. याअंतर्गत २ टप्प्यांमध्ये नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते आणण्यात आले, यापैकी ७ चित्त्यांचा आणि १३ पिल्लांचा मृत्यू झाला.
'गामिनी'ने केला ६ पिल्लांना जन्म देण्याचा विक्रम
Published on

भोपाळ : आफ्रिकेतून आणण्यात आलेल्या 'गामिनी' या मादी चित्त्याने मध्य प्रदेशच्या शेवपूर जिल्ह्यातील कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच नव्हे तर सहा पिल्लांना जन्म दिल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सोमवारी सांगितले. विशेष म्हणजे ६ पिल्लांना जन्म देत मादी चित्ता 'गामिनी'च्या नावावर आता नवा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच आई झालेली 'गामिनी' सहा पिलांना जन्म देणारी पहिला मादी चित्ता बनली आहे. 'गामिनी'ने कुनो राष्ट्रीय उद्यानात पाच पिल्लांना जन्म दिल्याची माहिती यादव यांनी १० मार्च रोजी दिली होती.

मात्र, पाच नव्हे तर 'गामिनी'ने सहा पिल्लांना जन्म दिल्याचे यादव यांनी 'एक्स' या समाज माध्यमावर जाहीर केले. भूपेंद्र यादव यांनी आज पुन्हा पिलांचे काही फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर टाकून पिल्लांची संख्या ६ असल्याचे सांगितले.

भारतात चित्त्यांच्या संवर्धनासाठी 'प्रोजेक्ट चित्ता' सुरु करण्यात आला. याअंतर्गत २ टप्प्यांमध्ये नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते आणण्यात आले, यापैकी ७ चित्त्यांचा आणि १३ पिल्लांचा मृत्यू झाला. यामुळे कुनोमध्ये चित्यांची संख्या आता २७ झाली आहे, त्यात १४ पिल्लांचा समावेश आहे. 'गामिनी'ने पिल्लांना जन्म देण्याआधी यावर्षी जानेवारी महिन्यात मादी चित्ता 'आशा'ने ३ पिल्लांना जन्म दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in