अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार पदाची शपथ

भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त होत असून त्यानंतर न्या. भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेतील.
अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई भारताचे नवे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार पदाची शपथ
सौजन्य : X @RetweetMarathi
Published on

नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना हे १३ मे रोजी निवृत्त होत असून त्यानंतर न्या. भूषण गवई हे सरन्यायाधीश होणार आहेत. ते भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून १४ मे रोजी शपथ घेतील. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू त्यांना सरन्यायाधीशपदाची शपथ देतील. भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे राज्यपाल रा. सु. गवई आणि कमलाताई गवई यांचे पुत्र आहेत.

सर्वोच्च न्यायालयातील सध्याच्या न्यायमूर्तींमध्ये भूषण गवई ज्येष्ठ असून पुढचे सरन्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणारे गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत. याआधी न्या. मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते.

अमरावतीत जन्मलेल्या भूषण गवई यांनी नागपूर विद्यापीठात कला शाखेतून पदवी घेतली. मुंबईतून कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी १९८५ मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. नागपूर बार असोसिएशनमध्ये न्यायमूर्ती गवई १९८५ मध्ये सहभागी झाले. त्यानंतर १९८७ ते १९९० या कालावधीत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली होती.

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर, औरंगाबाद, पणजी खंडपीठात न्यायमूर्ती म्हणूनही भूषण गवई यांनी काम केले आहे. २००३ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले होते. त्यानंतर २००५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश बनले. २०१९ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून शिफारस केली गेली. त्यानंतर आता त्यांची सरन्यायाधीश पदासाठी शिफारस करण्यात आली आहे. भूषण गवई हे २३ नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्यांचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असेल.

logo
marathi.freepressjournal.in