अयोध्येतून परतल्यानंतर पंतप्रधानांची मोठी घोषणा; एक कोटी घरांवर बसवणार 'ही ' यंत्रणा

'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' या नावाने ही योजना सुरु केली जाणार आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर घेतलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेतला आहे.
अयोध्येतून परतल्यानंतर पंतप्रधानांची मोठी घोषणा;  एक कोटी घरांवर बसवणार  'ही ' यंत्रणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्या येथे पार पडलेल्या राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर मोठा निर्णय घेतला आहे. सरकार देशातील एक कोटी घरांवर सोलर रूफटॉप यंत्रणा बसवणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' या नावाने ही योजना सुरु केली जाणार आहे. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर घेतलेल्या एका बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

मोदी यांनी त्यांच्या 'एक्स'पोस्टवरुन याबाबतची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, सूर्यवंशी भगवान श्री रामाच्या प्रकाशातून जगातील सर्व भक्तांना नेहमी ऊर्जा मिळते. आज, अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर, भारतातील लोकांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी, हा माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे.

"अयोध्येहून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे की, आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सोलर रूफ टॉप यंत्रणा बसवण्याचे ध्येय घेऊन 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल", अशी माहिती त्यांनी त्यांच्या पोस्टमधून दिली आहे.

दरम्यान, आज प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर लोकार्पण सोहळ्यात बोलताना पंतप्रधानांनी रामलल्लाच्या नावाचा अर्थ उलगडला. राम भारताची प्रतिष्ठा आहे. राम अग्नी नाही, राम ऊर्जा आहे. राम हा वाद नाही, राम हा उपाय आहे. राम फक्त आमचा नाही, राम सर्वांचा आहे. राम केवळ उपस्थित नाही, राम अनादि आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले. तसेच, राम भारताची प्रतिष्ठा आहे, राम मित्रता आहे, विश्व आहे, असे म्हणत हे केवळ मंदिर नाही तर भारताची ओळख असल्याचेही मोदी म्हणाले.

हे भव्य राम मंदिर विकसित भारताच्या उदयाचे साक्षीदार बनेल असे म्हणत, 2047 पर्यंत देशाला विकसित बनवण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या नव्या भारताशी राम मंदिराचा संबंध जोडून पंतप्रधानांनी लोकांना संघटित स्वरूपात एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही यावेळी केले.

logo
marathi.freepressjournal.in