
सरकारी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) लाखोंचे पॅकेज मिळत असतानाच खासगी बँकांच्या सीईओंना गलेलठ्ठ पॅकेज मिळत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने २०२२ चा वार्षिक अहवाल जारी केला आहे. यात एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांना २०२१-२२ मध्ये ३४ लाख रुपये वेतन दिल्याचे जाहीर केले आहे. एसबीआयच्या माजी अध्यक्ष रजनीश कुमार यांच्या वेतनापेक्षा हे वेतन १३.४ टक्के अधिक आहेत.
खारा यांना ऑक्टोबर २०२० मध्ये एसबीआयचे अध्यक्ष बनवले गेले. खारा यांना २०२१-२२ मध्ये २७ लाख रुपये बेसिक सॅलरी, ७ लाख ४२ हजार रुपये डीए व ४ लाख रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यात आली. गेल्यावर्षी त्यांना ३८ लाख रुपये देण्यात आले.
कॅनरा बँकेचे एमडी व सीईओ एल. व्ही. प्रभाकर यांना २०२१-२२ साठक्ष ३६.८९ लाख रुपये तर बँक ऑफ बडोदाच्या एमडी व सीईओ संजीव चंदा यांना ४०.९६ लाख रुपये वेतन देण्यात आले. खासगी बँकांच्या सीईओंना कोट्यवधींच्या घरात वेतन दिले जात आहे. एचडीएफसी बँकेचे एमडी व सीईओ आदित्य पुरी हे २०२०मध्ये निवृत्त झाले. त्यांना २०२१-२२ मध्ये बँकेने १३.८ कोटी देण्यात आले. तर २०१९-२० मध्ये सीईओ म्हणून १८.९ कोटी रुपये देण्यात आले.
एक्सीस बँकेचे सीईओ अमिताभ चौधरी यांना २०२१-२२ मध्ये ६.५ कोटी वेतन देण्यात आले. आयसीआयसीआय बँकेच्या एग्जीक्यूटिव डायरेक्टर विशाखा मुळे यांना २०२१-२२ मध्ये कंपनीने ५.६ कोटी रुपयांचे वेतन दिले होते.
तर एचडीएफसीचे सीईओ शशिधर जगदीशन यांना २०२०-२१ मध्ये बँकेने ४.८ कोटी वेतन दिले. तर आयसीआयसीआय बँकेचे सीईओ संदीप बक्षी यांना २०२०-२१ मध्ये बँकेने १ कोटी रुपये वेतन दिले.