बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला; १२२ जागांसाठी उद्या मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी संपला. दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी १४ नोव्हेंबरला होईल. या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात विक्रमी ६५ टक्के मतदान झाले.
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला; १२२ जागांसाठी उद्या मतदान
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रचार संपला; १२२ जागांसाठी उद्या मतदान
Published on

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार रविवारी सायंकाळी संपला. दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी १४ नोव्हेंबरला होईल. या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात विक्रमी ६५ टक्के मतदान झाले.

या टप्प्यातील महत्त्वाच्या जागांमध्ये जदयूचे मंत्री सुमित कुमार सिंह (चकाई), भाजप आमदार श्रेयसी सिंह (जमुई), जदयू मंत्री लेशी सिंह (धमदाहा) आणि भाजप मंत्री नीरज कुमार सिंह (छतापूर) आदींचा समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मतदारसंघांत सभा घेऊन झंझावाती प्रचार केला.

माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी किशनगंज आणि पूर्णिया जिल्ह्यांमध्ये सभा घेतल्या. जिथे मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय आहे आणि ज्यांचा पाठिंबा विरोधी ‘इंडिया’ आघाडीसाठी निर्णायक मानला जातो.

गांधी यांनी या निवडणुकीत १५ सभा घेऊन प्रचाराची राळ उठवली. काही महिन्यांपूर्वी त्यांनी १५ दिवस ‘मतदार अधिकार यात्रा’ काढली होती. ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक दिवस राज्यात मुक्काम करत तीव्र प्रचार मोहीम चालवली. त्यांनी सासाराम आणि अरवल येथे सभांना संबोधित केले.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशलगतच्या औरंगाबाद आणि कैमूर जिल्ह्यांत सभा घेतल्या. तर पंतप्रधान मोदी यांनी १४ सभांसह एक रोड शोही केला. या निवडणुकीत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी प्रथमच बिहारमध्ये जोरदार प्रचार केला. त्यांनी १० सभा आणि एक रोड शो घेतला.

भाजपच्या स्टार प्रचारात पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा समावेश होता. सध्याचे मुख्यमंत्री आणि जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनीही जोरदार प्रचार मोहीम राबवली. ते सलग पाचव्या कार्यकाळासाठी प्रयत्न करत आहेत.

माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे प्रतिस्पर्धी तेजस्वी यादव यांना ‘इंडिया’ आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्यामुळे त्यांनी आत्मविश्वासाने उत्साही प्रचार केला.

logo
marathi.freepressjournal.in