
पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल शिवीगाळ आणि अपशब्द उच्चारल्याच्या मुद्द्यावरून बिहारमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाटणा येथे काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले. यावेळी भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तसेच दोघांमध्ये तुफान राडा झाला. झेंडे, लाठ्याकाठ्या घेऊन दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले.
काँग्रेसचे आरोप
याबाबत माहिती देताना काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यालयाचे गेट तोडून आत घुसले. तसेच त्यांनी लाठीमार केला. कार्यालयात उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. तसेच दगडविटांचा मारा केला. यामध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना दुखापत झाली आहे. तसेच एका कार्यकर्त्याचे डोके फुटले, असा आरोपही या नेत्याने केला.
अमित शहा यांच्याकडून टीका
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. काँग्रेस नेत्यांनी मोदींच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द वापरून निदंनीय कृत्य केले आहे. मोदींना जगात नावाजले जाते. पण राहुल गांधींनी घृणा आणि तिरस्काराच्या नकारात्मक राजकारणाची सुरुवात केली आहे.
आरोपीला अटक
बिहारमधील दरभंगा येथे मोदी यांच्यासंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या युवकाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्याला बिहार पोलिसांनी अटक केली असून त्याचे नाव रिजवी असल्याचे समजते. तो दरभंगामध्येच राहतो. त्याने काँग्रेस रॅली दरम्यान मोदींसंदर्भात अपशब्द वापरले होते. यावरून राजकीय वातावरणही तापले होते. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. व्यासपीठावर उपस्थित नव्हते.
कमळ तितके फुलेल
अमित शहा यांनी यावेळी मोदींविरुद्ध अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेस नेत्यांची यादी दिली आणि अशा भाषेचा वापर करून निवडणूक जिंकता येईल का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सोनिया गांधी, मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह, जयराम रमेश, रेणुका चौधरी आणि काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांनी मोदींबद्दल अपमानास्पद भाषा वापरली आहे, असा आरोप अमित शहा यांनी केला. तसेच पंतप्रधान मोदींना तुम्ही जितक्या शिव्या द्याल, भाजपचे कमळ तेवढे अधिक फुलेल, असेही ते म्हणाले.
नड्डांनी केली माफीची मागणी
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. ते म्हणाले, काँग्रेसच्या तथाकथित 'व्होट अधिकार यात्रे'मध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस-राजदच्या व्यासपीठावरून मोदींसंदर्भात अपशब्द वापरण्यात आले, ते अत्यंत निंदास्पद आहे. दोन राजकुमारांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादांचे उल्लंघन केले आहे. एवढेच नाही तर, त्यांनी बिहारमध्येच बिहारी संस्कृतीचाही तिरस्कार केला आहे.