काँग्रेससह देशातील २६ विरोधी पक्षांची 'इंडिया' आघाडी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नितीश कुमार यांनी रविवारी कोलांटी उडी घेत पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेश केला. त्यानंतर नितीश यांनी सायंकाळी पाच वाजता भाजपच्या पाठिंब्यावर सत्तास्थापन केली आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उल्लेखनीय म्हणजे अवघ्या चार वर्षांमध्ये त्यांनी तिसऱ्यांदा आणि 2000 सालापासून तब्बल नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश नवव्यांदा शपथ घेत असल्याची बाब इंटरनेटवर लगेचच व्हायरल झाली आणि त्यावरून अनेकांनी नितीश कुमार यांना ट्रोल केले.
पाटणा येथील राजभवनात बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी नितीश कुमार यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रतिज्ञापत्र वाचतानाचा नितीश यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याखाली "वाचताय कशाला? आतापर्यंत तर पाठ (शपथ) झाली असेल", अशी कमेंट बऱ्याच नेटकऱ्यांनी केली.
बघा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
मजेशीर मीम्स आणि पोस्ट्स देखील व्हायरल झाल्या.
"जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत शपथ घेतच राहणार", अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. तर, शपथ पाठ होत नाही म्हणूनच वारंवार ते मुख्यमंत्री बनत आहेत, असेही एकाने लिहिले.
अलीकडेच पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाला सोडून तिसऱ्यांदा लग्न केले. त्यावरून, 'शोएब मलिक तिसऱ्यांदा लग्नाची शपथ वाचत आहे', अशा कॅप्शनसह नितीश कुमारांच्या शपथविधीचा फोटो काहींनी व्हायरल केला.
"राज्यपालांनी प्रतिज्ञापत्रासह नितीश कुमरांच्याच घरी वास्तव्य करावे. कधी गरज पडेल माहीत नाही", असेही एकाने म्हटले.
नऊ जणांनी घेतली शपथ-
रविवारी नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या बिहार सरकारमध्ये सम्राट चौधरी (भाजप) उपमुख्यमंत्री, विजय सिन्हा (भाजप) उपमुख्यमंत्री, डॉ. प्रेम कुमार (भाजप) मंत्री, विजय कुमार चौधरी (जेडीयू) मंत्री, विजेंद्र प्रसाद यादव (जेडीयू) मंत्री, श्रवण कुमार (जेडीयू) मंत्री, संतोष कुमार सुमन (हम) मंत्री, सुमित कुमार सिंह (अपक्ष) मंत्री यांनी पदाची शपथ घेतली.