पाटणा/नवी दिल्ली: मतचोरी आणि 'एसआयआर' च्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव 'मतदार हक्क अधिकार यात्रे'च्या निमित्ताने बिहारचा दौरा करत आहेत. आपल्या भाषणांमधून राहुल गांधी सातत्याने नरेंद्र मोदींवर मतचोरीचा आरोप करत आहेत.
अशातच, दरभंगा येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईच्या नावाने शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखालील यात्रेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे स्पष्ट करून भाजपने याबद्दल राहुल गांधींकडे माफी मागण्याची मागणी केली आहे.
युथ काँग्रेसच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये राहुल गांधींचे कार्यकर्ते पंतप्रधान मोदींना आईच्या नावाने शिव्या देताना दिसत आहेत. हा कार्यक्रम युवक काँग्रेसच्या मोहम्मद नौशादने आयोजित केला होता.
उपमुख्यमंत्री विजय सिन्हा म्हणाले की, राहुल गांधींच्या मंचावरुन मोदींना अपशब्द वापरण्यात आला. अशा प्रकारची भाषा सहन करण्यायोग्य नाही. काँग्रेस आणि राजद बिहारमधील वातावरण बिघडवू इच्छितात. मोदींना शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तेजस्वी आणि राहुल यांनी याबद्दल माफी मागावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
भाजपवर मतचोरीचा आरोप
राहुल गांधींनी सीतामढीमधून मोदींवर पुन्हा मतचोरीचा आरोप केला. जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला माहिती आहे की, भाजपवाले बिहारमधील निवडणुका चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक आधी तुमचे मत घेतील, नंतर तुमचे रेशन कार्ड घेतील आणि नंतर आधारही हिसकावून घेतील, म्हणूनच आम्ही 'मतदार हक्क यात्रा' सुरू केली आहे. निवडणूक आयुक्तांना हे माहित असले पाहिजे की, बिहारमधील लोक हुशार आहेत आणि एकही मत चोरू देणार नाहीत.