Bihar Election 2025 : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ मतदारसंघांमध्ये ६४.६६ टक्के इतके मतदान झाले. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान झाले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांतील १२१ मतदारसंघांमध्ये ६४.६६ टक्के इतके मतदान झाले. बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान झाले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांमध्ये मतदारांचा उत्साह कमी दिसला. गुरुवारी झालेल्या मतदानात राज्याचे दोन उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजयकुमार सिन्हा आणि इंडिया आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार व राजदचे नेते तेजस्वी यादव यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

पहिल्या टप्प्यातील १२१ विधानसभा मतदारसंघात एकूण १ हजार ३१४ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये १ हजार १९२ पुरुष आणि केवळ १२२ महिलांचा समावेश होता. बिहार निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील १०२ मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी होते. तर १९ जागा अनुसूचित जातींसाठी राखीव होत्या.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

पहिल्या टप्प्यात सम्राट चौधरी, विजय कुमार सिन्हा या दोन उपमुख्यमंत्र्यांसह १८ मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच विरोधी पक्षाच्या आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव, लालूप्रसाद यादव यांचे जेष्ठ पुत्र तेज प्रताप यादव यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदान

बेगुसराय जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ६७.३२ टक्के मतदान झाले, तर शेखपुरा जिल्ह्यात सर्वात कमी ५२.३६ टक्के मतदान झाले. बिहारची राजधानी पाटणामध्ये ५५.०२ टक्के मतदान झाले. १२१ जागांपैकी तीन जागांवर सर्वात कमी मतदान झाले. यामध्ये पाटणामधील शहरी भागात कुम्हरार येथे ३९.५२%, दिघा येथे ३९.१०% आणि बांकीपूर येथे ४०% मतदान झाले.

दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा ११ नोव्हेंबरला मतदान

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील २० जिल्ह्यांतील १२२ मतदारसंघामध्ये ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. तर बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in