

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि.११) मंगळवारी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. यापूर्वी ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत १२१ जागांसाठी ६५ टक्के मतदान झाले होते. आज २० जिल्ह्यांतील १२२ जागांसाठी मतदान होत आहे.
दुसऱ्या टप्प्यात १३०२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. पश्चिमी चंपारण, पूर्वी चंपारण, सीतामढ़ी, शिवहर, मधुबनी, सुपौल, अररिया, किशनगंज, पूर्णिया, कटिहार, भागलपुर, बांका, जमुई, नवादा, गया, औरंगाबाद, जहानाबाद, अरवल, कैमूर आणि रोहतास या जिल्ह्यांमध्ये मंगळवारी मतदान होणार आहे.
या टप्प्यातील महत्त्वाच्या लढतींमध्ये जदयूचे मंत्री सुमित कुमार सिंह (चकाई), लेशी सिंह (धमदाह), भाजप मंत्री नीरज कुमार सिंह (छतापूर) आदींचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रचाराचे रान उठवले, तर विराधी पक्षांतर्फे राहुल गांधी, प्रियांका गांधी, तेजस्वी यादव, सपा नेते अखिलेश यादव यांनी जोरदार प्रचार केला.