बिहार निवडणुकीत १४ हजार कोटींच्या विकासनिधीचा वापर; जनसुराज पक्षाच्या आरोपामुळे खळबळ

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला बिहारच्या निव़डणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र, त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांनी, बिहारच्या निवडणुकीत जागतिक बँकेचा १४ हजार कोटी रुपयांचा निधी वापरला गेला असल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे.
बिहार निवडणुकीत १४ हजार कोटींच्या विकासनिधीचा वापर; जनसुराज पक्षाच्या आरोपामुळे खळबळ
Published on

पाटणा : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला बिहारच्या निव़डणुकीत एकही जागा जिंकता आलेली नाही. मात्र, त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय सिंह यांनी, बिहारच्या निवडणुकीत जागतिक बँकेचा १४ हजार कोटी रुपयांचा निधी वापरला गेला असल्याचा गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे.

विकास प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आलेला १४ हजार कोटी रुपयांचा जागतिक बँकेचा निधी बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांना प्रत्येकी १०,००० रुपये देण्यासाठी वळवण्यात आला आणि याचा निवडणुकीत मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत पैशाचा गैरवापर आणि निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करण्याचा प्रयत्न झाला असून याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जनसुराज पक्षाच्यावतीने उदय सिंह यांनी केली आहे.

उदय सिंह यांनी म्हटले आहे की, या निवडणुकीत २१ जूनपासून मतदानाच्या दिवसापर्यंत हा जनादेश मिळवण्यासाठी जवळजवळ ४०,००० कोटी रुपये खर्च करण्यात आले. जनसुराज पक्षाचे प्रवक्ते पवन वर्मा यांनी म्हटले आहे की, राज्याच्या तिजोरीतील रक्कम आता संपली आहे. आमच्याकडे अशी माहिती आहे की, राज्यातील महिलांना देण्यात आलेली १०,००० रुपयांची रक्कम जागतिक बँकेकडून दुसऱ्या विकासाच्या प्रकल्पांसाठी घेण्यात आलेली होती. पण त्यामधूनच निवडणुकीच्या आचारसंहितेच्या एक तास आधी १४ हजार कोटी रुपये काढून राज्यातील १.२५ कोटी महिलांना वाटण्यात आले आहेत, असा आरोप वर्मा यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in