पाटणा : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने २४३ पैकी २०२ जागा जिंकून महाविजय मिळवला आहे. या निवडणुकीत लढवलेल्या १०१ पैकी ८९ जागा जिंकून भाजप मोठा भाऊ झाला आहे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जदयूने १०१ पैकी ८५ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस, राजद, सीपीआय व अन्य पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला असून त्यांना केवळ ३५ जागांवर समाधान मानावे लागले. या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्रीपद आता कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार बनवण्यासाठी १२२ आमदारांची गरज असून हा जादुई आकडा रालोआने सहज पार केला आहे.
चिराग पासवान यांच्यासोबत आघाडी केल्याने जेडीयूला ३५ जागांचा फायदा झाल्याचे दिसते. तर चिराग पासवान यांच्या एनडीएसोबतच्या युतीमुळे त्यांनाही फायदा झाला आहे.
प्रशांत किशोर निष्प्रभ
निवडणूक रणनीतीकार, देशातील अनेक पक्षांना आजवर निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्यात सहाय्य करणारे प्रशांत किशोर यांनी यावेळी स्वतःचा पक्ष निवडणुकीत उतरवला होता. मात्र, त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही. त्यांनी २३८ जागा लढवल्या होत्या. मात्र, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही.
या निवडणुकीत ‘एआयएमआयएम’ने पाच मतदारसंघांमध्ये विजय मिळवला आहे. त्या तुलनेत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस या निवडणुकीत एमआयएमपेक्षाही मागे राहिली आहे. काँग्रेसला केवळ चार जागांवर आघाडी मिळाली आहे.
मतदार यादीच्या सखोल पुनर्विलोकनामुळे (एसआयआर) यंदा बिहारच्या निवडणुकीत वादंग माजला होता. राहुल गांधी यांनी मतदार जनजागृती यात्रा काढून निवडणुकीत हवा भरली. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रालोआचे प्रमुख चेहरा होते. त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्या जोरदार प्रचारामुळे भाजपप्रणीत रालोआला अभूतपूर्व विजय मिळाला.
या निवडणुकीत भाजपचा विजयचा स्ट्राईक रेट ९५ टक्के आहे. यामुळे बिहारमधील भाजपची स्थिती अधिकच बळकट झाली आहे. तर राजद, काँग्रेस आणि तीन डाव्या पक्षांचा समावेश असलेल्या महाआघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. विविध सर्वेक्षणांत मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंती मिळालेल्या तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वालाही मतदारांनी नाकारल्याचे दिसत आहे.
दिल्ली, महाराष्ट्र आणि हरयाणा येथे भाजपला सलग मिळालेल्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवर रालोआला बिहारमधील मिळालेला विजय महत्त्वाचा मानला जात आहे.
मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याचा फायदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना व जदयूला मिळाला आहे. २०२० मध्ये केवळ ४३ जागा जिंकणाऱ्या जदयूला यंदा ८४ जागा मिळाल्या आहेत, त्यांना १९ टक्के मते मिळाली आहेत.
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पक्षाने २८ उमेदवार उभे केले व त्यांनी १९ जागा जिंकल्या आहेत.
पाटण्यात जोरदार जल्लोष
या निवडणूक विजयानंतर पाटण्यातील भाजप आणि जदयूच्या कार्यालयांमध्ये ढोल, फटाके आणि घोषणांनी जल्लोष सुरू झाला. भाजपने पाटणा शहरात लाडू वाटप केले. तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांचे समर्थक ‘टायगर अभी जिंदा है’ या पोस्टरसह फोटो काढत होते.
दिग्गज विजयी
उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (तारापूर) येथून विजयी झाले आहेत. त्यांनी राजदचे उमेदवार अरुण कुमार यांना ४५,८२० मतांनी पराभूत केले. तेजस्वी प्रसाद यादव (राघोपूर, राजद), मैथिली ठाकूर (अलीनगर, भाजप), मंगल पांडे (सिवान, भाजप), अनंत कुमार सिंग (मोकामा, जदयू), रामकृपाल यादव (दानापूर, भाजप) हे विजयी झाले आहेत.
दिग्गज पराभूत
छपरा मतदारसंघातून राजदचे उमेदवार व भोजपुरी गायक खेसारी लाल यादव निवडणूक हरले आहेत. ‘महुआ’तून जनशक्ती जनता दलाचे नेते व लालूप्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव हे पराभूत झाले. ‘कुटुंबा’ मतदारसंघातून राजेश राम (काँग्रेस) हरले आहेत.
नितीश कुमार यांचे २१ मंत्री विजयी
नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील २१ मंत्र्यांनी या निवडणुकीत विजय मिळवला आहे. यात प्रेम कुमार, महेश्वर हजारी आणि संजय सरावगी यांचा समावेश आहे.
बिहारच्या जनतेने दिलेले एकेक मत महत्त्वाचे - शहा
बिहारच्या जनतेने दिलेले एकेक मत भारताच्या सुरक्षेशी खेळणारे घुसखोर व त्यांच्या हितसंबंधींच्या विरोधात असून मोदी सरकारच्या धोरणावरील विश्वासाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. मतपेटीसाठी घुसखोरांना वाचवणाऱ्यांना जनतेने परखड उत्तर दिले आहे. बिहारच्या जनतेने पूर्ण देशाचा मूड जाहीर केला आहे की, मतदार याद्यांची फेरतपासणी करावीच लागणार आहे. याविरोधातील राजकारणाला कोणतीही जागा नाही. त्यामुळेच राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस आज बिहारमध्ये शेवटच्या पायरीवर पोहोचली आहे
माझ्या सरकारवरचा हा विश्वास - नितीश कुमार
बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचंड विजयानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, जनतेने आमच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मतदारांचे धन्यवाद. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे त्यांचेही आभार. तसेच रालोआतील सर्व घटकपक्षांनी जी मेहनत घेतली त्यांचेही आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे बिहार पुढे जाईल व देशातील विकसित राज्यांच्या यादीत सामील होईल, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला.
तेजस्वी ‘फेलस्वी’ झाले - तेजप्रताप यादव
जनशक्ति जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांनी पराभवानंतर सांगितले की, निवडणूक निकाल आम्ही जनादेश म्हणून स्वीकारत आहोत. आता राजकारणातील घराणेशाही चालणार नाही. आता सुशासन व शिक्षणावर भर देण्यास पाठिंबा मिळेल, असा संदेश बिहारने दिला आहे. या निवडणुकीनंतर बिहारमधून काँग्रेसचे अस्तित्व संपेल, असे आपण निवडणुकीपूर्वीच सांगितले होते. जयचंदने राजदला आतून पोखरले असून तेजस्वी ‘फेलस्वी’ ठरला आहे, अशी टीका त्यांनी केली.
राहुल गांधी यांना चिमटा
भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींना चिमटे काढत म्हटले, ‘नेहरू यांच्या जयंतीनिमित्त राहुलकडून काँग्रेसला भेट. ९५ वा पराभव पुन्हा पुन्हा! वारसा गेला, विश्वासार्हताही गमावली!’
निवडणूक पहिल्यापासूनच निष्पक्ष नव्हती - राहुल गांधी
बिहारचा निकाल आश्चर्यकारक आहे. ही निवडणूक पहिल्यापासूनच निष्पक्ष नव्हती. ही लढाई राज्यघटना व लोकशाहीच्या संरक्षणाची आहे. आम्ही निकालाचा अभ्यास करून लोकशाही वाचवण्याचे प्रयत्न अधिक प्रभावीपणे करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
राजदला सर्वाधिक मते, पण जागा कमी
या निवडणुकीत राजद मतांबाबत बिहारमधील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. राजदला १ कोटी १० लाख ६३ हजार मते मिळाली आहेत. संयुक्त जनता दलाला ९२ लाख ८४ हजार, भाजपला ९७ लाख ५५ हजार, काँग्रेसला ४२ लाख ३५ हजार, लोकजनशक्ती पार्टीला (रामविलास पासवान) २४ लाख ३९ हजार मते मिळाली आहेत.
‘महिला कॅश स्कीम’ विजयाची गुरुकिल्ली
निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ सुरू केली. या योजनेत त्यांनी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये १ कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात १०,००० रुपये हस्तांतरित केले. ज्या महिला या पैशांचा वापर फायदेशीर व्यवसाय सुरू करण्यासाठी करतील, त्यांना निवडणुकीनंतर २ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल, अशी घोषणाही त्यांनी केली. त्याचा लाभ रालोआ झाल्याचे दिसून येत आहे.
विकास, सुशासनाचा विजय - पंतप्रधान मोदी
हा विकास व सुशासन, सामाजिक न्याय व जनकल्याणाचा विजय आहे. बिहारच्या माझ्या सर्व कुटुंबीयांचे विशेष आभार. त्यांनी निवडणुकीत रालोआला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. हा मोठा जनादेश जनतेच्या सेवेसाठी आहे, अशी प्रतिक्रिया मोदी यांनी दिली.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सर्वानुमते - विनोद तावडे
आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो आहोत. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पाचही पक्ष मिळून घेऊ. येत्या चार दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.