

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज (दि.६) मतदान होत असतानाच तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. लखीसराय जिल्ह्यात मतदानादरम्यान 'राडा' झाला. राष्ट्रीय जनता दल (RJD) समर्थकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांच्या गाडीला घेराव घालत चप्पला फेकल्या आणि घोषणाबाजी केली. घटनास्थळावरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, आंदोलक “विजय सिन्हा मुर्दाबाद” अशा घोषणा देत उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनाला अडवताना दिसत आहेत.
“यांच्या छातीवर बुलडोझर...: विजय सिन्हा
या घटनेनंतर विजय सिन्हा यांनी RJD समर्थकांवर हिंसाचार आणि धमकीचा आरोप केला. ते म्हणाले, “हे RJDचे गुंड आहेत. NDA पुन्हा सत्तेत येते आहे, आता यांच्या छातीवर बुलडोझर चालेल! हे गुंड मला गावात जाण्यापासून अडवत आहेत. विजय सिन्हा जिंकणार आहे म्हणून घाबरलेत. त्यांनी माझ्या पोलिंग एजंटलाही मतदान करू दिले नाही आणि त्याला परत पाठवले. त्यांची गुंडगिरी बघा… ही घटना खोरियारी गावातील ४०४ आणि ४०५ क्रमांकाच्या बूथवरील आहे”, असे सिन्हा घटनेनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.
पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात
घटनास्थळी पोलिस कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी गर्दीला शांत करत उपमुख्यमंत्र्यांचा ताफ्यासाठी मार्ग मोकळा केला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
सकाळी ११:०० पर्यंत २७.६५ टक्के मतदान
बिहार विधानसभा निवडणूक २०२५ साठी मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सकाळी ७ वाजेपासून सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधील १२१ जागांसाठी मतदान होत असून १३१४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी ११:०० वाजेपर्यंत निवडणूक आयोगाने २७.६५ टक्के मतदानाची नोंद केली.