"कचरा पुन्हा कचऱ्याच्या डब्ब्यात, थुंकून चाटणारे....", नितीश आणि मोदींबाबत लालूंच्या कन्येची पोस्ट चर्चेत

बिहारच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथेनंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत.
"कचरा पुन्हा कचऱ्याच्या डब्ब्यात, थुंकून चाटणारे....", नितीश आणि मोदींबाबत लालूंच्या कन्येची पोस्ट चर्चेत

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी महाआघाडी सोडून एनडीएमध्ये सामील होत असल्याची घोषणा केली आणि राज्यपालांची भेट घेऊन भाजप-जेडीयूच्या एनडीए सरकारचा दावा केला. ते संध्याकाळी भाजपसोबत नवं सरकार स्थापन करणार आहेत. बिहारच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथेनंतर आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी नितीश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेली पोस्ट चर्चेत आहे. 'कचरा पुन्हा कचऱ्याच्या डब्ब्यात गेला' अशी पोस्ट करत नाव न घेता रोहिणी यांनी नितीश कुमारांवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी भाजपलाही अप्रत्यक्षपणे 'कचरा - मंडळी' असं म्हटलंय. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ शेअर करीत 'थूककर चाटने वाला नेता', असे कॅप्शन दिले आहे.

रोहिणी एकामागून एक पोस्ट करत व्यक्त होत आहेत. नितीश कुमारांवर निशाणा साधताना रोहिणी यांनी़, "कचरा पुन्हा कचऱ्याच्या डब्ब्यात गेला, 'कचरा - मंडळी'ला दुर्गंधीयुक्त कचऱ्याच्या शुभेच्छा!", अशी पोस्ट करत सोबत कचरागाडीचा फोटो जोडला आहे. एका पोस्टमध्ये, 'उसके साथ रहना बेकार है, जिसकी विचारधारा गिरगिट कुमार है' असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, त्यांनी लालू यादव यांचे 2017 चे ट्विट देखील पुन्हा शेअर केले ज्यामध्ये लालूंनी नितीश यांना साप म्हटले होते.

रोहिणी आचार्य यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही एक भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये मोदी विधानसभेत महिलांबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून नितीश कुमार यांच्यावर टीका करीत आहेत. नितीश इतके घाण बोलतील याची कोणी कल्पनाही करू शकत नाही, असे पीएम मोदी म्हणत आहेत. पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करताना रोहिणी यांनी, "थूककर चाटने वाले नेता, खुद को ना समझे सूरज जैसा..", अशी पोस्ट केली आहे.

दरम्यान, संध्याकाळी नितीश कुमार भाजपसोबत नवं सरकार स्थापन करतील. ते चार वर्षांत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर भाजप आमदारांची बैठक झाली, ज्यामध्ये बिहार भाजप प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. सम्राट चौधरी आणि विरोधी पक्षनेते विजय सिन्हा हे दोघेही नव्या सरकारमध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री असतील. बिहारच्या राजकीय समीकरणाबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपकडे विधानसभेच्या 78 जागा आहेत, तर जेडीयूकडे 45 आमदार आहेत. तर एनडीएचा मित्रपक्ष एचएएमचे 4 आमदार आहेत. हा एकूण आकडा 127 होतो जो बहुमतापेक्षा 5 ने अधिक आहे.

logo
marathi.freepressjournal.in