पाटणा : बिहार विधानसभा जागावाटपावरून विरोधकांच्या महाआघाडीत मतभेद असताना एका संयुक्त पत्रकार परिषदेत राजदचे नेते तेजस्वी यादव यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्रीपदासाठी मुकेश साहनी यांच्या नावाची घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.
अशोक गेहलोत ‘जादूगार’ नावाने ओळखले जातात. आता त्यांनी केलेली घोषणा महाआघाडीसाठी जादू ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. त्यावेळी विरोधकांच्या महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करणे टाळले होते, पण बिहारमध्ये तसे घडलेले नाही.
सगळ्यांची मते विचारात घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाबद्दलचा निर्णय घेतला असल्याचे गेहलोत यांनी सांगितले. मुकेश साहनी हे मल्लाह समाजातून येतात. बॉलिवूडमधून परतलेले 'सन ऑफ मल्लाह' यांनी गेल्या काही वर्षांत बिहारच्या राजकारणात जम बसवला आहे. बिहारमध्ये मल्लाह समाजाची लोकसंख्या २.६ टक्के आहे.
महाआघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचे उमेदवार जाहीर करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी महाआघाडीतील सगळ्या नेत्यांचे आभार मानले. सगळ्या सहकारी पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवला. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सत्ताधारी एनडीएला केवळ सत्तेची भूक आहे. आम्हाला जनतेने आशीर्वाद द्यावा. एनडीएने ३० वर्षांत जे केले नाही ते आम्ही केवळ ३० महिन्यांत करून दाखवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाआघाडीतील नेते, कार्यकर्ते केवळ सरकार स्थापन करण्यासाठी सोबत आलेले नाहीत. आम्ही बिहार घडवण्यासाठी सोबत आलो आहोत, असे तेजस्वी यादव म्हणाले. एनडीए नितीशकुमार यांच्यावर अन्याय करत असल्याची टीका त्यांनी केली. एनडीएच्या प्रचारात नितीश कुमार यांच्या चेहऱ्याचा वापर का केला जात नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नितीश यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आलेली नाही. हा त्यांच्यावरील अन्यायच असल्याचे तेजस्वी यादव म्हणाले.