

पाटणा : बिहारमधील दारुण पराभवातून लालूप्रसाद यादव यांचे कुटुंब अद्याप सावरलेले नसतानाच राजदमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जदयूचे नेते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 'ऑपरेशन तीर' सुरू केले असून, राजदबरोबरच काँग्रेस, एमआयएम व बसपामध्येही फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
राजदचे २५ पैकी १३ आमदार पक्षाला रामराम ठोकण्याच्या मन:स्थितीत आहेत. परंतु पक्षबदल कायद्यापासून वाचण्यासाठी आणखी आमदारांना फोडण्याची तयारी सुरू आहे. पक्षबदल कायद्यानुसार, दोन-तृतीयांश आमदार फुटणे गरजेचे आहे. अन्यथा आमदारकी जाऊ शकते. म्हणजेच राजदचे १९ आमदार फुटल्यासच काम फत्ते होणार आहे. जदयूने त्यांना आकर्षित करण्यासाठी सहा मंत्रिपदे रिक्त ठेवली आहेत.
बिहारमध्ये एकूण ३६ मंत्रिपदे आहेत. मुख्यमंत्र्यांसह केवळ २७ जणांनी शपथ घेतली. जदयू ऑपरेशन तीरच्या माध्यमातून बिहारमधील सर्वात मोठा पक्ष होऊ इच्छित आहे. पक्षाचा संख्येच्या बाबतीत भाजपपेक्षा वरचढ ठरण्याचा मानस आहे. जे नितीश कुमार यांच्यासमवेत येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी दारे खुली आहेत. आम्हाला गरज नाही. परंतु कोणी येऊ इच्छित असेल तर नकारही देणार नाही.राजदमध्ये कोणीही नाराज नाही. सर्व नेते तेजस्वी यादव यांच्याशी प्रामाणिक आहेत. आमदाराफुटीची चर्चा निरर्थक आहे, असा दावा राजदकडून केला जात आहे.
नितीश कुमार एनडीएमध्ये पुन्हा मोठा भाऊ होऊ इच्छितात. २०२०पासून भाजप या भूमिकेत आहे. एमआयएम आमदारांसमोर पर्याय नाही. कारण राजदच खूप कमकुवत आहे. काँग्रेसमधील आमदार जदयूमध्ये जाण्यास तयार आहेत. पुन्हा सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सक्रियता वाढली.नितीश कुमार २०१७मध्ये महाआघाडीतून वेगळे होऊन एनडीएमध्ये परतले होते, तेव्हा तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी, तीन आमदारांसह अनेक नेते घेऊन जदयूमध्ये गेले होते. अशोक चौधरी यांना नितीश कुमार यांनी कॅबिनेट मंत्री केले होते.