

पाटणा : बिहार निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाला आलेल्या अपयशानंतर लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबात फूट पडली असून त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी थेट कुटुंबाशी सर्व संबंध तोडण्याची घोषणा केली आहे.
रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा ‘एक्स’वर पोस्ट टाकत तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीझ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला काल अपमानित केले गेले, शिव्या दिल्या गेल्या, मारण्यासाठी चप्पल उगारली गेली, असे म्हणत ‘मला अनाथ बनवण्यात आले’, असा आरोप रोहिणी आचार्य यांनी केला आहे.
काल एका मुलीला, एका बहिणीला, एका विवाहित महिलेला, एका आईला अपमानित करण्यात आले, घाणेरड्या शिव्या देण्यात आल्या, मला मारण्यासाठी चप्पल उगारण्यात आली. पण मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही, सत्याचा त्याग केला नाही. फक्त आणि फक्त यामुळे मला अपमान सहन करावा लागला. काल एका मुलीने तिच्या आईवडिलांना आणि बहिणींना असहाय्यतेने सोडले, मला माझे माहेर सोडावे लागले, मला अनाथ बनवण्यात आले. तुम्ही सर्वांनी कधीही माझ्या मार्गावर जाऊ नका. रोहिणीसारखी मुलगी किंवा बहीण कोणत्याही घरात जन्माला येऊ नये, असे रोहिणी आचार्य यांनी म्हटले आहे.
रोहिणी आचार्य यांनी शनिवारीही एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये म्हटले होते की, मी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर मी माझ्या कुटुंबीयांशीही सर्व संबंध तोडत आहे. संजय यादव आणि रमीज यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे. मी जो काही निर्णय घेतला आहे त्यासाठी पूर्णपणे मी जबाबदार आहे.
शाप लागला, निकामी किडनी दान केल्याचाही आरोप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्वी यादव यांनी रागाच्या भरात रोहिणी आचार्य यांना अपशब्द वापरले आणि तुझ्यामुळेच आम्ही निवडणूक हरलो आणि आम्हाला शाप लागला आहे, असे सुनावले. रोहिणी आचार्य यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत भावनिक आणि धक्कादायक खुलासा केला. त्यांना केवळ अपशब्द वापरले गेले नाहीत, तर त्यांच्यावर ‘करोडो रुपये घेऊन, तिकीट खरेदी करून वडिलांना निकामी किडनी दान केली’, असा खोटा आरोप करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘सुन लो जयचंदो’ तेजप्रताप भडकले
मी आरजेडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माझे वडील आणि माझे राजकीय गुरू लालू प्रसाद यादवजी यांना विनंती करतो की, बाबा, मला एक संकेत द्या, तुमचा केवळ एक इशारा आणि बिहारचे लोक स्वतः या जयचंदांना जमिनीत गाडतील. ही लढाई पक्षाची नाही, तर कुटुंबाच्या सन्मानाची, मुलीच्या प्रतिष्ठेची आणि बिहारच्या स्वाभिमानाची आहे, असे म्हणत तेजप्रताप यादव हे रोहिणी यांच्या समर्थनार्थ पुढे सरसावले आहेत. तेजप्रताप यांनी ‘सुन लो जयचंदो’ म्हणत सोशल मीडिया पोस्टद्वारे विरोधकांना इशारा दिला. त्यांनी लिहिले, कालच्या घटनेने माझ्या मनाला मोठा हादरा बसला आहे. माझ्यासोबत जे घडले, ते मी सहन केले. मात्र, माझ्या बहिणीचा जो अपमान झाला आहे, तो कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाऊ शकत नाही. ऐका जयचंदांनो, कुटुंबावर वार कराल तर, बिहारची जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही.
तेजस्वी यांच्या अन्य ३ बहिणींनीही निवासस्थान सोडल्याचे वृत्त
मिळालेल्या माहितीनुसार, रोहिणी आचार्य यांच्या पाठोपाठ लालू यादव यांच्या कन्या रागिणी यादव, चंदा यादव आणि राजलक्ष्मी यादव यांनीही तातडीने आपली मुले व कुटुंबीयांसह पाटणा येथील निवासस्थान सोडले असून, त्या दिल्लीला रवाना झाल्या आहेत. लालू कुटुंबातील चार मुलींनी एकाचवेळी पाटणा सोडणे हा केवळ कौटुंबिक वाद नसून, तो पक्षाच्या नेतृत्वासंदर्भात तेजस्वी यादव यांच्यावर बहिणींनी टाकलेला बहिष्कार मानला जात आहे. रोहिणी आणि आता इतर तीन बहिणींच्या पाटणा सोडण्याच्या निर्णयामुळे आरजेडीच्या नेतृत्वावर आणि तेजस्वी यादव यांच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एनडीए सरकारला ‘जेजेडी’चे समर्थन
लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचा पक्ष जनशक्ति जनता दलाने एनडीए सरकारला नैतिक समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लालू यादवांची मुलगी रोहिणी आचार्य यांना पक्षाच्या राष्ट्रीय संरक्षक बनवण्याचाही प्रस्ताव ठेवण्यात अल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते प्रेम यादव यांनी दिली. तेज प्रताप लवकरच त्यांच्याशी या प्रस्तावावर चर्चा करणार आहेत.