बिहार मतदार यादीतून नावे वगळायला २ लाख अर्ज; निवडणूक आयोगाची माहिती

बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनादरम्यान, जवळपास २ लाख लोकांनी आपली नावे वगळण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने शनिवारी दिली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली: बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनादरम्यान, जवळपास २ लाख लोकांनी आपली नावे वगळण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने शनिवारी दिली.

दुसरीकडे, सुमारे ३० हजार अर्ज नाव समाविष्ट करण्यासाठी मिळाले आहेत. १ ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रकाशित करण्यात आली असून, १ सप्टेंबरपर्यंत नागरिक व राजकीय पक्षांकडून "दावे आणि हरकती" स्वीकारल्या जाणार आहेत.

निवडणूक कायद्यांनुसार, मसुदा यादीतील अपात्र व्यक्तींच्या नावांचा समावेश आव्हान देण्याचा अधिकार नागरिक व पक्षांना आहे. त्याचप्रमाणे, पात्र असूनही नाव वगळले गेले असल्यास तेही समाविष्ट करण्याची मागणी करू शकतात.

नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता असलेल्या बिहारची अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबरला प्रसिद्ध होईल.

एका गावातील ९४७ मतदार एकाच घरात

बिहारच्या मसुदा मतदार याद्यांमध्ये गया जिल्ह्यातील संपूर्ण गावच एका घरात राहत असल्याचे दाखवले गेले असल्याची धक्कादायक माहिती राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर नव्याने आरोप करताना उघड केली आहे. काँग्रेसने 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे, की गया जिल्ह्यातील बारा चट्टी विधानसभा मतदारसंघातील निदानी गावात एका मतदान केंद्रावरील सर्व ९४७मतदार 'घर क्रमांक सहा'चे रहिवासी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

काल्पनिक क्रमांक

दरम्यान, बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. गया जिल्हाधिकाऱ्यांच्या 'एक्स' खात्यावर याबाबत एक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामध्ये म्हटले आहे की, ज्या गावांमध्ये किवा झोपडपट्टी वस्त्यांमध्ये घरांना प्रत्यक्ष मालिका क्रमांक नसतात, तिथे 'काल्पनिक / नाममात्र घर क्रमांक' देण्यात येतो.

देशव्यापी चळवळ होईल - राहुल

बिहारमध्ये सुरू असलेली मतदार अधिकार यात्रा ही मतचोरी विरोधातील देशव्यापी चळवळ होईल, असे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले. बिहारमधील मतदार यादी सखोल तपासणीविरोधात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. गांधी हे याबाबत निवडणूक आयोगावर टीका करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in