नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी लोकसभा व राज्यसभेत विरोधी पक्षांनी जोरदार गदारोळ केला. बिहारमध्ये मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणाविरोधात विरोधकांनी सभागृहात आणि बाहेर गोंधळ घातला. पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर आदी मुद्द्यांवर पंतप्रधानांचे उत्तर व सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली.
लोकसभेची कार्यवाही सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत दुपारी १२ वाजेपर्यंत ती स्थगित करण्यात आली. विरोधी पक्षांचा गदारोळ सुरू असताना लोकसभेचे कामकाज सुरू करण्यात आले. मात्र, काही वेळातच दुपारी २ वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्यात आले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी मकरद्वारावर बिहारच्या मतदार यादी पुनर्विलोकनाचा विरोध केला. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज २३ जुलैपर्यंत स्थगित करण्यात आले.
लोकसभा व राज्यसभेची बैठक बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा सुरू होणार आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार चर्चेसाठी तयार आहे. मात्र, विरोधी पक्ष गदारोळ करून जनतेचा पैसा फुकट घालवत आहे, असा आरोप त्यांनी केला.
भारत धर्मशाळा नाही - भाजप
बांगलादेशी, रोहिंग्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी विरोधी पक्ष झटत आहेत. त्यामुळेच ते मतदार यादी पुनर्विलोकनाला विरोध करत आहेत, अशी टीका भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केली. भारत ही धर्मशाळा नाही. राज्यघटनेनुसार केवळ भारताचे नागरिक मतदान करू शकतात. त्यामुळे मतदार यादीच्या तपासणीला विरोध का? असा प्रश्न त्यांनी केला.
पाटणा : बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या सखोल परीक्षणात ५२ लाख मतदारांचे नाव रद्द करणे आता नक्की झाले आहे. निवडणूक आयोगाने ५२.३० लाख मतदारांची यादी जाहीर केली. त्यातील बहुतांशी मतदार हे मृत किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. त्यातील १८ लाख ६६ हजार ८६९ जण मृत पावले आहेत. २६ लाख १०३१ मतदार दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाले. तर ७ लाख ५० हजार ७४२ मतदारांचे नाव एकाहून अनेक मतदारयादीत आहेत. तसेच ११,४८४ मतदारांचा कोणताच पत्ता नाही.