
नवी दिल्ली : देशात स्तनाच्या कर्करोगांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाच्या निदान करणाऱ्या चाचण्या खर्चिक व वेळखाऊ आहेत. या पार्श्वभूमीवर आता ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), रूरकीला’ने खास ‘बायोसेन्सर’ मशीन बनवले आहे. या मशीनद्वारे स्तनातील कर्करोगाच्या पेशी ओळखता येतात. यामुळे खर्चिक लॅबच्या चाचण्यांपासून मुक्तता मिळू शकेल.
‘एनआयटी’च्या संशोधकांनी सांगितले की, या ‘बायोसेन्सर’साठी कोणत्याही रसायनांची गरज लागणार नाही. हे ‘बायोसेन्सर’ अतिशय प्रभावी असून ते आरोग्यदायी पेशी व कर्करोग पेशी शोधून काढतात. पूर्वीच्या पद्धतीपेक्षा हे यंत्र प्रभावीपणे काम करते. याबाबतचे संशोधन नामवंत ‘मायक्रोसिस्टीम टेक्नॉलॉजी’ जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक प्रसन्न कुमार साहू म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेष म्हणजे भारतात गेल्या काही दशकांपासून स्तनांचा कर्करोग वाढला आहे. प्राथमिक पातळीवर कर्करोगाच्या पेशी दिसून येत नाहीत. या कर्करोगाची माहिती प्रारंभी मिळाल्यास त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येऊ शकते. तसेच तो बराही होऊ शकतो.
सध्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान करताना एक्स-रे, मॅमोग्रॉफी, ‘एलिसा’, अल्ट्रासोनोग्राफी, एमआरआय आदींचा वापर केला जातो. यासाठी अत्यंत विशेष उपकरणे व कुशल मनुष्यबळ लागते. दुर्गम भागात ही निदान केंद्रे नसतात, असे साहू म्हणाले.
कोविड-१९ च्या महासाथीमध्ये ही आव्हाने होती. कारण वैद्यकीय संसाधने सर्वत्र पोहचवण्याचे आव्हान होते. कारण कर्करोगाचे निदान करताना विलंब झाल्यास त्याच्या उपचारांनाही उशीर होतो. त्यामुळे सोपी, वेगवान व स्वस्त निदान यंत्रणा बनवणे गरजेचे होते. तसेच या यंत्रणांसाठी गुंतागुंतीची पायाभूत सुविधांची गरज नसावी, असे त्यांनी सांगितले.
‘एनआयटी’च्या पथकाने नावीन्यपूर्ण विचार करून कर्करोगाच्या पेशी शोधून काढणारी यंत्रणा तयार केली. कर्करोगग्रस्त पेशी या पाण्यात अधिक घन असतात. त्यामुळे आरोग्यदायी व कर्करोगग्रस्त पेशी ओळखणे सोपे होते. या संशोधन पथकाने प्रस्तावित ‘टनेल फिल्ड इफेक्ट ट्रान्ससिस्टॉर’ (टीएफईटी) तयार केले. हे मशीन स्तनाच्या कर्करोगाचे पेशी शोधून काढते. ‘टीएफईटी’ हे मशीन इलेक्ट्रॉनिक्स कामासाठी वापरले जाते. त्याला जैविक सामुग्री लावल्यानंतर त्याचा वापर कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. रुग्णाच्या स्तनाखाली एक लहान पोकळी खोदली जाते. त्यानंतर पेशींच्या जैविक नमुन्याशी संबंधित सामग्री पोकळीत ठेवली जाते. त्यानंतर सेन्सर नमुन्याच्या गुणधर्मांवर आधारित सिग्नलमधील बदल सांगतो. कर्करोगाच्या पेशी ‘टी ४७ डी’ या आरोग्यदायी पेशींपेक्षा अधिक घन असतात. हे सेन्सर दोन पेशीतील फरक ओळखतो. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान किफायतशीर आहे, असे साहू म्हणाले.
नवे तंत्रज्ञान वापरण्यास सोपे
‘टीएफईटी’ हे बायोसेन्सरवर आधारित तंत्रज्ञान किफायतशीर व वापरण्यास सोप आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील वैद्यकीय सामुग्रीत मोठे बदल होऊ शकतात. त्यामुळे कमी खर्चात व सहजपणे निदान करणे शक्य होईल, असे संशोधक प्रियांका करमरकर यांनी सांगितले.