बिस्लेरीचे पाणी सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा

बिस्लेरी इंटरनॅशनलने आपल्या बाटलीबंद पिण्याचे पाणी सुरक्षित असल्याचा दावा केला असून अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या तपासणीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
बिस्लेरीचे पाणी सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा
बिस्लेरीचे पाणी सुरक्षित असल्याचा कंपनीचा दावा
Published on: 

नवी दिल्ली : बिस्लेरी इंटरनॅशनलने आपल्या बाटलीबंद पिण्याचे पाणी सुरक्षित असल्याचा दावा केला असून अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या तपासणीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने बाटलीबंद पाण्याच्या प्रमुख ब्रँड्सची तपासणी मोहीम तीव्र केली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत.

बिस्लेरीच्या पाण्याच्या नमुन्यात निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ब्रोमेट आढळल्याने तसेच पुढील तपासणीत पॉलीन्यूक्लियर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आढळल्याने कंपनीविरोधात खटला चालविण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, प्रयोगशाळांच्या अहवालांमध्ये विसंगती असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीच्या गोवा प्रकल्पात सप्टेंबर २०२५ मध्ये उत्पादित एका बॅचचा हा नमुना असल्याचे कंपनीने म्हटले आहे. एफएसएसएआयने घेतलेल्या सहा नमुन्यांपैकी पाच नमुने मानकांनुसार होते, तर एका नमुन्यात ब्रोमेटचे प्रमाण १२ मायक्रोग्रॅम प्रति लिटर आढळले.

निर्धारित मर्यादा १० मायक्रोग्रॅम होती. पुनर्तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण मर्यादेत असल्याचे आढळले, मात्र पॉलिन्यूक्लिअर अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आढळल्याचे कंपनीने म्हटले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)