
नवी दिल्ली : गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर करताना भाजपलाही लक्ष्य केले होते. त्यावरून आता भाजपने काँग्रेसवर थेट हल्ला चढविताना, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव ४५ वर्षांपूर्वी म्हणजे त्या भारतीय नागरिक होण्यापूर्वीच बेकायदेशीरपणे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते, असा आरोप केला आहे.
भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये आरोप केला आहे की, सोनिया गांधी यांचे नाव १९८० आणि १९८३ मध्ये दोनदा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. या दोन्ही वेळा त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नव्हते. हे संपूर्ण प्रकरण निवडणूक कायद्याचे स्पष्ट उल्लंघन करणारे आहे आणि कदाचित हेच कारण आहे की राहुल गांधीही अपात्र किंवा बेकायदेशीर मतदारांना कायदेशीर करण्याच्या बाजूने प्रयत्न करीत आहेत आणि “स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन”ला (एसआरआर) विरोध करत आहेत.
इटालियन नागरिक असताना मतदारयादीत नाव
मालवीय यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, सोनिया गांधी यांचे नाव पहिल्यांदा १९८० मध्ये मतदार यादीत नोंदवले गेले होते, त्यावेळी त्या इटालियन नागरिक होत्या आणि त्यांना भारतीय नागरिकत्व मिळाले नव्हते. त्यावेळी गांधी कुटुंब पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अधिकृत निवासस्थान १, सफदरजंग रोड येथे राहत होते. त्यावेळी या पत्त्यावर इंदिरा गांधी, राजीव गांधी, संजय गांधी आणि मनेका गांधी यांची नावे मतदार म्हणून होती, परंतु १९८० मध्ये नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाची मतदार यादी सुधारित करण्यात आली, ज्यामध्ये १ जानेवारी १९८० ही ‘पात्रता तारीख’ म्हणून दाखवण्यात आली आणि मतदान केंद्र १४५ मध्ये अनुक्रमांक ३८८ वर सोनिया गांधी यांचे नाव जोडण्यात आले.
कुटुंबानेच ठरवावे काय हवे?
दुसरीकडे खासदार अनुराग ठाकूर यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, इंदिरा गांधी म्हणत होत्या की, मतदार मूर्खांचा समूह असतात. राजीव गांधी निवडणूक हरले तेव्हा त्यांनी मतपत्रिकेला दोष दिला. ते म्हणायचे की निवडणुका ईव्हीएमवर घ्याव्यात आणि आता राहुल गांधी म्हणतात की निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात. हे लोक दुसऱ्यांवर आरोप करत राहतात म्हणून आता त्यांच्या कुटुंबानेच ठरवावे की कोणाला काय हवे आहे.