

नवी दिल्ली : आगामी लोकसभा आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीची नवीन टीम जाहीर केली आहे. त्यामध्ये खासदार विनोद तावडे यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे, तर लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातून काहीशा बाजूला पडलेल्या स्मृती इराणी यांना पक्षात जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचसोबत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनाही पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी दिली आहे. राम माधव यांच्यावरही राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नेते नितीन नबीन यांनी ही बहुप्रतीक्षित कार्यकारिणी जाहीर केली. महाराष्ट्रातून विनोद तावडे पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री (सरचिटणीस), डॉ. भारती प्रवीण पवार राष्ट्रीय उपाध्यक्ष, पीयूष गोयल यांच्यावर राष्ट्रीय कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून प्रीती गांधी यांची सोशल मीडिया सह-संयोजकपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या नव्या संघटनाव्यचनेत देशातील इतर प्रमुख नेत्यांकडे खालीलप्रमाणे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. स्मृती इराणी (उत्तर प्रदेश) राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड, वसुंधरा राजे शिंदे राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती, बी. एल. संतोष (दिल्ली): राष्ट्रीय महामंत्रीपदी (संघटन) कायम. तर राजेश मंगल (राजस्थान) यांची राष्ट्रीय सह-कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल बलुनी हे पक्षाचे 'मीडिया-इन-चार्ज' म्हणून काम पाहणार आहेत. नव्या कार्यकारिणीत १३ उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महामंत्री आणि १६ राष्ट्रीय मंत्री आहेत. त्यामध्ये उत्तर प्रदेशातून तब्बल ८ जणांना संधी देण्यात आली आहे.
सरचिटणीस किती
या नवीन टीममध्ये विनोद तावडे, सुनील बन्सल, बिप्लब कुमार देब, स्मृती इराणी, सतीश पुनिया, गजेंद्र पाटील, हरीश द्विवेदी आणि संजय भाटिया हे भाजपाचे सरचिटणीस असणार आहेत. तर बी. एल. संतोष हे सरचिटणीस (संघटना) म्हणून काम पाहतील. पियुष गोयल हे खजिनदार तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदावर कायम ठेवण्यात आले आहे. या फेरबदलाचा उद्देश नवीन पिढीतील नेत्यांना संधी देणे, महिलांचे प्रतिनिधित्व वाढवून आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखणे हा आहे.
मार्गदर्शक टीम
पक्षाच्या रचनेत सर्वोच्च स्थानी चार सदस्यांची 'मार्गदर्शक टीम' आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते एल. के. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी, तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा समावेश आहे.
मार्गदर्शक टीमनंतर १२ सदस्यांचे संसदीय मंडळ असून त्याचे अध्यक्षपदही मोदींकडेच आहे. या मंडळात ज्येष्ठ मंत्री आणि पक्षातील प्रभावशाली नेत्यांचा समावेश आहे. यात नितीन नबीन, राजनाथ सिंह, अमित शाह, जे. पी. नड्डा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, ओबीसी सेलचे प्रमुख के. लक्ष्मण, पंजाबचे इक्बाल सिंग लालपुरा, हरियाणाच्या सुधा यादव, मध्य प्रदेशचे नेते सत्यनारायण जटिया आणि बी. एल. संतोष यांचा समावेश आहे.
केंद्रीय निवडणूक समिती
या समितीचे अध्यक्षपदही मोदींकडेच आहे. यात संसदीय मंडळातील १२ सदस्यांव्यतिरिक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख वनथी श्रीनिवासन यांचा समावेश आहे.
या नव्या चमूमध्ये आगामी राज्य विधानसभा निवडणुका आणि प्रादेशिक समतोल लक्षात घेऊन अनेक महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. या कार्यकारिणीत युवा आणि महिला नेतृत्वाला विशेष स्थान देण्यात आले असून जातीय समीकरणांचीही योग्य सांगड घातली गेली आहे. या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नेत्यांनाही महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.
अमित मालवीय यांना हटवले
केंद्रीय संघटनेतून अमित मालवीय यांना वगळण्यात आले हा सर्वात मोठा बदल आहे. त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय आयटी सेल प्रमुखपदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी छत्तीसगडचे दीपक म्हस्के यांची भाजपच्या राष्ट्रीय आयटी सेल आणि सोशल मीडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मालवीय हे २०१५ पासून या सेलचे प्रमुख होते. मोदी सरकारच्या बाजूने जनमत तयार करण्यात या सेलचा मोठा वाटा होता.
मुस्लिम नेत्याला संधी
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उत्तर प्रदेशातील मुस्लिम नेत्याला संधी मिळाली आहे. नवीन यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत तारिक मन्सूर यांचे नाव आहे. तारिक मन्सूर सध्या उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेचे आमदार आहेत. ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरूही होते. ओबीसी मुस्लिम समुदायाला आपल्याकडे वळवण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते. उत्तर प्रदेशातील कुंवर बासित अली यांना भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आले आहे.