पोटनिवडणुकीत भाजपला धक्का

देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. एकूण चार राज्यांमधील पाच जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते, मात्र भाजपला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
पोटनिवडणुकीत भाजपला धक्का
Published on

नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. एकूण चार राज्यांमधील पाच जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते, मात्र भाजपला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे. पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुका २०२६ मध्ये होणार असून त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या ठरलेल्या पाच विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने बाजी मारली आहे. भाजपने सर्वच जागांवर उमेदवार उभे केले असतानाही त्यांना केवळ गुजरातमधील कडी या सुरक्षित जागेवर विजय मिळवताआला आहे. पंजाबमधील लुधियाना वेस्ट विधानसभा मतदारसंघात ‘आप’चे संजीव अरोरा यांनी १० हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. ‘आप’चे आमदार गुरप्रीत गोगी यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली होती. अरोरा यांच्या प्रचारासाठी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी मैदानात उतरले होते. काँग्रेसचे भारत भूषण आशू दुसऱ्या स्थानी, तर भाजपचे जीवन गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर होते.

गुजरातच्या विसावदरमध्ये ‘आप’चे इटालिया विजयी

गुजरातमधील विसावदरमध्ये ‘आप’चे माजी राज्याध्यक्ष आणि पाटीदार आंदोलनातील नेते गोपाल इटालिया यांनी भाजपच्या किरीट पटेल यांचा १७ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. ही जागा याआधी ‘आप’कडे होती, मात्र भूपेंद्र भायाणी यांच्या भाजप प्रवेशामुळे ती रिकामी झाली होती. या विजयामुळे गुजरातमध्ये भाजपच्या एकाधिकाराविरुद्ध ‘आप’ने पुन्हा एकदा अस्तित्व दाखवले आहे.

गुजरातचा कडी मतदारसंघ भाजपकडे

कडी मतदारसंघात भाजपचे राजेंद्र चावडा यांनी ३९ हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. ही सुरक्षित जागा फेब्रुवारीत आमदार कर्सन सोलंकी यांच्या निधनामुळे रिकामी झाली होती. काँग्रेसकडून रमेश चावडा आणि ‘आप’कडून जगदीश चावडा हे उमेदवार होते.

निलांबूरमध्ये काँग्रेस आघाडीने (यूडीएफ) आपला मजबूत गड राखला. आर्याडन शोकत यांनी डाव्या आघाडीचे एम. स्वराज यांचा ११ हजार मतांनी पराभव केला.

नदिया जिल्ह्यातील कालीगंज मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या अलिफा अहमद यांनी ५० हजारांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. ही जागा त्यांच्या वडिलांच्या माजी आमदार नसीरुद्दीन अहमद यांच्या निधनामुळे रिकामी झाली होती.

मतमोजणीवेळी स्फोट

कालीगंजमध्ये मतमोजणीदरम्यान परिसरात स्फोट झाल्याने एका किशोरीचा मृत्यू झाला. भाजपने आरोप केला की, विजयानंतर तृणमूलच्या मिरवणुकीत स्फोटकांचा वापर झाला. कालीगंज हा प्रामुख्याने ग्रामीण आणि मुस्लिमबहुल मतदारसंघ असून येथील निकाल २०२६ च्या निवडणुकांसाठी दिशा ठरवणारा मानला जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in