भाजप केडर आधारित पक्ष ;पंतप्रधान मोदींनी सांगितले नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री करण्याचे कारण

भाजप केडर आधारित पक्ष ;पंतप्रधान मोदींनी सांगितले नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री करण्याचे कारण

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपने जातीय समीकरणेही सोडवली आहेत.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली. पक्षाने असे चेहरे निवडले, ज्यांच्या नावाचा कोणीही अंदाज लावू शकत नव्हते.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून भाजपने जातीय समीकरणेही सोडवली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने असा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मध्य प्रदेशात मोहन यादव हे ओबीसी प्रवर्गातून आले आहेत, तर राजस्थानमध्ये सामान्य प्रवर्गातून आलेले भजनलाल शर्मा मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचबरोबर छत्तीसगडमध्ये आदिवासी चेहरा विष्णुदेव साई यांच्याकडे राज्याचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. एवढेच नाही, तर तिन्ही राज्यांमध्ये विविध समाजाचे प्रत्येकी दोन उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत.

पक्षाने असा निर्णय का घेतला, दिग्गज नेत्यांना डावलून नवख्यांना संधी का दिली? असे प्रश्न अनेकांना पडले होते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी यावर भाष्य केले आहे. एका मुलाखतीत मोदींनी तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, 'आपल्या देशाचे दुर्दैव आहे की, जे लोक आपल्या भाषणातून, बुद्धिमत्तेने आणि व्यक्तिमत्त्वातून समाज जीवनावर प्रभाव निर्माण करतात, त्यांच्यातील एक मोठा वर्ग जुनाट, बंदिस्त मानसिकतेत अडकला आहे. हे केवळ राजकीय क्षेत्रापुरते मर्यादित नाही, तर ही प्रवृत्ती आपल्याला जीवनाच्या सर्व क्षेत्रांत त्रास देते.'

ते म्हणाले, 'एखाद्या क्षेत्रात ठरावीक नाव मोठे झाले, एखाद्याने स्वतःचा ब्रँड केला तर इतरांकडे लोकांचे लक्ष जात नाही. मग तो कितीही प्रतिभावान असला, कितीही चांगला असला तरी असेच घडते. दुर्दैवाने राजकीय क्षेत्रातही असेच घडत आले आहे. अनेक दशके माध्यमांचे लक्ष ठरावीक काही कुटुंबांवरच राहिले. त्यामुळेच नवीन लोकांची प्रतिभा आणि उपयुक्तता, यावर कधीच चर्चा होऊ शकली नाही. म्हणून कदाचित काही लोक तुम्हाला नवीन वाटतात, पण सत्य हेच आहे की, ते नवीन नसतात. त्यांची स्वतःची दीर्घ तपश्चर्या आणि अनुभव आहे. भाजप हा केडर आधारित राजकीय पक्ष आहे. संघटनेच्या प्रत्येक स्तरावर काम करत असताना कार्यकर्ते कितीही दूर गेले तरी त्यांच्यातील कार्यकर्ता सदैव जागृत असतो,' असे पीएम मोदी म्हणाले.  

logo
marathi.freepressjournal.in