भाजपची सुरतवर स्वारी! मतमोजणीपूर्वीच उघडले खाते; मुकेश दलाल बिनविरोध विजयी: काँग्रेसचा अर्ज बाद

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असतानाच भाजपने सुरतची जागा बिनविरोध जिंकल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
भाजपची सुरतवर स्वारी! मतमोजणीपूर्वीच उघडले खाते; मुकेश दलाल बिनविरोध विजयी: काँग्रेसचा अर्ज बाद
फोटो सौजन्य - एएनआय

सुरत : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असतानाच भाजपने सुरतची जागा बिनविरोध जिंकल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गुजरातमधील सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने ‘चारसो पार’ची घोषणा दिली आहे. सुरतची एक जागा भाजपने बिनविरोध खिशात टाकल्याने भाजपला आता ३९९ जागांसाठी संघर्ष करावा लागणार आहे.

निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यानंतर अन्य सर्वच उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे मुकेश दलाल बिनविरोध लोकसभेवर निवडून गेले आहेत.

भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी ‘एक्स’वरून सांगितले की, सुरतने पंतप्रधान मोदींना पहिले कमळ भेट दिले आहे. या मतदारसंघात निवडून आलेले मुकेश दलाल यांचे आम्ही अभिनंदन करतो.

सुरत जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माहितीनुसार, मुकेश दलाल सोडून अन्य आठ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. सुरतचे काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभाणी यांचे नामांकन करणाऱ्या प्रस्तावकांच्या अक्षरात विसंगती आढळली. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज रद्द केला. त्यानंतर काँग्रेसचे ‘डमी’ उमेदवार सुरेश पडसाला यांचा उमेदवारी अर्जही रद्द झाला. दरम्यान, कुंभाणी यांचा उमेदवारी अर्ज भाजपच्या इशाऱ्यावरून रद्द केला, असा आरोप काँग्रेसने केला आहे.

हुकूमशाहीचे दर्शन घडले

सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यावर टीका केली आहे. भाजपच्या या विजयात हुकूमशाहीचे खरे दर्शन घडले आहे. आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार काढून घेणे म्हणजे डॉ. आंबेडकर यांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे. ही निवडणूक केवळ सरकार स्थापन करणारी नाही. ही निवडणूक संविधानाच्या संरक्षणाची आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in