भगवान जगन्नाथांबद्दल चुकीचे वक्तव्य; भाजप उमेदवार पात्रा प्रायश्चित्त घेणार

भगवान जगन्नाथांबद्दल मत व्यक्त करताना पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांची जीभ घसरली आणि त्यावरून गदारोळ माजल्यानंतर पात्रा यांनी प्रायश्चित्त म्हणून मंगळवारपासून तीन दिवस उपवास करणार असल्याचे जाहीर केले.
भगवान जगन्नाथांबद्दल चुकीचे वक्तव्य; भाजप उमेदवार पात्रा प्रायश्चित्त घेणार
ANI

भुवनेश्वर : भगवान जगन्नाथांबद्दल मत व्यक्त करताना पुरी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांची जीभ घसरली आणि त्यावरून गदारोळ माजल्यानंतर पात्रा यांनी प्रायश्चित्त म्हणून मंगळवारपासून तीन दिवस उपवास करणार असल्याचे जाहीर केले.

राज्याचे आराध्य दैवत असलेले भगवान जगन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त आहेत, असे वक्तव्य पात्रा यांनी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या वार्ताहरांशी बोलताना केले. मात्र, मोदी हे भगवान जगन्नाथांचे भक्त आहेत, असे आपल्याला म्हणावयाचे होते, अशी सारवासारव पात्रा यांनी केली. या चुकीबद्दल भगवान जगन्नाथ यांच्या चरणी माफी मागतो आणि चुकीचे प्रायश्चित्त म्हणून पुढील तीन दिवस आपण उपवास करणार आहोत, असे त्यांनी 'एक्स'वर म्हटले आहे.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पात्रा यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि राजकारणापासून भगवान जगन्नाथ यांना दूर ठेवा, असे आ‌वाहन त्यांनी केले आहे. ओदिशाच्या अस्मितेला धक्का पोहोचविल्याबद्दल पटनायक यांनी पात्रा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in