

नवी दिल्ली : जंतरमंतरवर अलीकडेच झालेल्या आंदोलनाचा मोठा धसका भाजपने घेतला आहे. आता देशातील 'जेन-झी' मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने खास टीम तयार केली आहे. त्यात भाजप अध्यक्ष नितीन नवीन, राष्ट्रीय सरचिटणीस स्मृती इराणी आणि विनोद तावडे यांच्यासह गुजरातचे मंत्री हर्ष संघवी आणि छत्तीसगडचे मंत्री ओपी चौधरी यांचा समावेश आहे.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात शनिवारी नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली ६५ सदस्यांच्या नव्या राष्ट्रीय टीमची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत 'वंदे मातरम' बाबत काँग्रेस निर्णयाविरोधात एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. भाजपने काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताची (वंदे मातरमचे) केवळ दोनच कडवी गायच्या निर्णयाचा निषेध केला.
१४ ते २५ वर्षांच्या तरुणांवर लक्ष केंद्रीत
भाजपची नवी टीम 'जेन-झी' मध्ये 'युवा संवाद' मोहीम राबवेल. याअंतर्गत १४ ते २५ वयोगटांतील तरुणांना पक्षासोबत जोडण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. युवा मतदारांपर्यंत पक्षाची धोरणे पोहोचविणे आणि संपर्क मजबूत करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. याअंतर्गत चर्चा, संवाद आणि 'युवा संवाद' यासारखे कार्यक्रम होतील. या कार्यक्रमांच्या माध्यमातून 'जेन-झीं'ची विचारसरणी, त्यांच्या चिंता, गरजा आणि अपेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. तरुणांना भाजपच्या नेत्यांशी थेट संवाद साधण्याची आणि आपले मुद्दे मांडण्याची संधीही दिली जाईल.
'वंदे मातरम्' साठी जनजागृती मोहीम
भाजपच्या नवीन कार्यकारिणीच्या बैठकीत आगामी निवडणुका, संघटना मजबूत करणे आणि पक्षाच्या विविध कार्यक्रमांवर चर्चा झाली. नवीन यांनी सांगितले की, भाजप यापुढे 'वंदे मातरम्'चा इतिहास आणि महत्त्व देशभरात पोहोचवण्यासाठी मोहीम राबवेल. विशेषतः तरुणांमध्ये जनजागृती मोहीम चालवली जाईल, जेणेकरून नव्या पिढीला संपूर्ण 'वंदे मातरम्' आणि त्याच्याशी संबंधित इतिहास समजेल. याआधी १९ ऑगस्ट रोजी काँग्रेस कार्य समितीने १९३७ च्या आपल्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम्' राष्ट्रगीताची पहिली दोनच कडवी गायली जातील. काँग्रेसच्या या निर्णयाला भाजपने विरोध केला आहे.