मोदी तिसऱ्यांदा रिंगणात

नरेंद्र मोदींनी प्रथमच ३७० कलम हटविल्यानंतर श्रीनगरमध्ये मोठी सभा घेतली. त्यात त्यांनी काश्मीरवासियांना भारतीय संघराज्यात आले म्हणून घाबरू नये. जे गुजरात-महाराष्ट्रात निर्णय होतात तेच निर्णय काश्मिरात होतील अशी ग्वाही दिली.
मोदी तिसऱ्यांदा रिंगणात

- अरविंद भानुशाली

मतं आणि मतांतरे

लोकसभा निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे. भाजपने तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर केले आहे. ३७०-४०५ जागांचा जोगवा मागत आहेत. एकूण सद्य:स्थिती पाहता नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी बसू शकतात असे विरोधी पक्षाचे नेतेही खाजगीत बोलत आहेत.

निव्वळ मोदी विरोधासाठी २३ राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. हे मोदींना हरवू शकतात का? निवडून न येणारे इंडिया आघाडीचे ४-५ खासदारही सभेमध्ये मोदींची हुकूमशाही संपविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असे म्हणतात. सध्या अरविंद केजरीवाल व सोरेन यांच्या अटकेवरून इंडिया आघाडीत वादळ सुरू आहे.

नरेंद्र मोदींनी प्रथमच ३७० कलम हटविल्यानंतर श्रीनगरमध्ये मोठी सभा घेतली. त्यात त्यांनी काश्मीरवासियांना भारतीय संघराज्यात आले म्हणून घाबरू नये. जे गुजरात-महाराष्ट्रात निर्णय होतात तेच निर्णय काश्मिरात होतील अशी ग्वाही दिली. गेल्या २५-३० वर्षात भारतातील कुठल्याही पंतप्रधानांनी श्रीनगरमध्ये जाहीर सभा घेतली नव्हती. हे केवळ ३७० कलम उठविल्यामुळे शक्य झाले.

स्वातंत्र्यानंतर गेली ७५ वर्षे काश्मीरचा प्रश्न देशाच्या मुळावर आला होता. पाकिस्तानमधून अनेक दहशतवादी टोळ्यांनी धुडकुस घातला होता. शेकडो जवानांना प्राण गमवावे लागले.

आता काश्मीरमधील व इतर शहरांमध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु झाले आणि त्याचाच परिणाम म्हणजे श्रीनगरमध्ये झालेली मोदींची पहिली विराट सभा हे यश महत्वाचे नाही का? परंतु यावरही काँग्रेसपासून अनेक नेत्यांनी टीका केली. मात्र भारतीय जनतेने त्याचे उत्स्फूर्त असे स्वागत केले. ही किमया मोदींनी करून दाखवली.

गेले चारशे वर्षे न सुटणारा अयोध्या राम मंदिर हा प्रश्न ही न्यायालयामार्फत कुठलेही दंगे न होता सोडविला. या दोन्ही प्रश्नावर देशात अराजक निर्माण होईल अशी अपेक्षा काँग्रेस व विरोधकांची होती. रामजन्मभूमी न्यासाच्या निर्णय येताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर उभारणीच्या कामाकडे लक्ष दिले. एवढेच नव्हे तर त्या अयोध्येमध्ये विमानतळ व रेल्वे गाड्यांची सुविधाही फक्त तीन महिन्यात उपलब्ध करून दाखविली. हे सर्व मोदी यांच्यामुळेच शक्य झाले असे विरोधकांना वाटत नाही का? परंतु भारतातील जनता या दोन्ही महत्वाच्या निर्णयामुळे कुणाच्या मागे उभी आहे हे सांगण्याची गरज नाही.

एवढेच नाही तर २०१४ मध्ये मोदी यांचे सरकार आले आणि तेव्हा असलेली आर्थिक स्थिती आणि आज २०२४ मध्ये झालेली आर्थिक क्रांती पाहता जगाच्या इतिहासात भारताचा नंबर आज वरच्या स्थानी आहे. यापूर्वी आपल्या देशाचे केंद्रीय अर्थमंत्री कटोरा घेऊन अमेरिका, फ्रांस, इंग्लंड इत्यादी युरोपियन देशात जात होते. आज ती परिस्थिती राहिली नाही. जगामध्ये भारताचा हा आर्थिक दृष्टया मजबूत झाल्याचे दृश्य हे दहा वर्षातले हे चित्र आहे. अंतरिक्ष क्षेत्रातही आज भारत पुढे चालला आहे. २०१४ पूर्वी एकही साधा उपग्रह काँग्रेस राजवटीत उडू शकला नव्हता. त्या अंतरिक्ष क्षेत्रात भारताने जवळ जवळ अमेरिकेएवढे क्षेत्र मिळवले आहे.

भारत सरंक्षण क्षेत्रात मजबूत व्हावा यासाठी बाहेरून कोट्यवधी रुपयाची शास्त्र सामग्री आणण्याऐवजी आता ती भारतात बनवली जात आहेत. पायाभूत सुविधांमध्ये विशेषत: दळण-वळणाच्या क्षेत्रामध्येही देश पुढे जात आहे. परवा उत्तराखंडमधील एक अधिकारी इन्स्पेक्शनच्यासाठी आमच्या गावात आला होता. त्याने जगामध्ये पहिला क्रमांक कोणाला द्यावा तर नितीन गडकरी व मोदी यांनाच असे सांगितले. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच नरेंद्र मोदी यांना भेटायला येतात हा फरक नाही का?

कॅनडामध्ये एका भारतीय शिखाची हत्या झाली त्यावर तेथील सरकारने भारतावर तेथील सरकारने नेम धरण्याचा प्रयत्न केला . तेवढ्याच ताकदीने कॅनडाला उत्तर दिले व आपल्या वकिलाला भारतात परतण्यास सांगितले. असे करताच कॅनडा सरकारने माफी मागितली. असे पूर्वी कधी घडले होते का? हे सर्व चित्र पाहिल्यानंतर आज मोदी तिसऱ्यांदा का आवश्यक आहेत हे भारतीय जनतेला पक्के ठाऊक आहे.

logo
marathi.freepressjournal.in