विरोधकांच्या युतीला भाजप घाबरत नाही - गौतम गंभीर

दिल्लीला वाचवण्याची जबाबदारी आमची आहे", अशा शब्दांत गंभीरने अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
विरोधकांच्या युतीला भाजप घाबरत नाही - गौतम गंभीर
Published on

नवी दिल्ली : दिल्लीत आलेल्या पुरावरून आता तेथील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील पुरासाठी भाजपला दोषी ठरवले आहे, तर दुसऱ्या बाजूने भाजप खासदार गौतम गंभीरने सत्ताधारी 'आप'वर सडकून टीका केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शहरातील पायाभूत सुविधांवर किती पैसा खर्च झाला हे सांगावे, असे आवाहन गंभीरने केले आहे. याशिवाय विरोधकांच्या कोणत्याही बैठकीला अथवा युतीला भारतीय जनता पक्ष घाबरत नसल्याचे त्याने म्हटले आहे.

गौतम गंभीर माध्यमांशी संवाद साधत असताना त्याला विरोधकांच्या बैठकीबद्दल प्रश्न विचारला असता त्याने म्हटले, "देशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा त्यांनी चांगली मेहनत करावी. आगामी पंतप्रधान कोण असेल हे जनता ठरवेल आणि आम्ही त्यासाठी मेहनत घेत आहोत. भाजप ना कोणत्या युतीशी घाबरली आहे ना भविष्यात घाबरेल." दिल्लीत ओल्या दुष्काळाचे सावट पाहता गंभीरने सत्ताधारी आम आदमी पार्टीवर टीका केली. "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील जनतेला सांगावे लागेल की शहरातील पायाभूत सुविधांवर किती पैसा खर्च झाला आणि किती पैसा जाहिरातींवर खर्च केला गेला. दिल्लीला वाचवण्याची जबाबदारी आमची आहे", अशा शब्दांत गंभीरने अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

logo
marathi.freepressjournal.in