बंगळुरू : कर्नाटकमध्ये झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सय्यद नासीर हुसेन हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी कथितपणे पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा दिल्या त्या प्रकरणी सात जणांची पोलीस चौकशी करीत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे सांगितले. या प्रकारावरून प्रमुख विरोधी पक्ष भाजप आणि जेडीएसने काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला चढविला.
कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राज्य सरकार बरखास्त करण्याची शिफारस करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. हुसेन यांच्या समर्थकांनी जी देशविरोधी घोषणाबाजी केली त्याची राष्ट्रीय तपास यंत्रणा, गुप्तचर विभाग आणि अन्य राष्ट्रीय संस्थांमार्फत चौकशी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज भवन येथे राज्यपालांना सांगितले.