भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ममता बॅनर्जी यांच्याविरोधात सुवेंदू अधिकारी उतरणार रणांगणात

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने सोमवारी १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात सुवेंदू अधिकारी हे रणांगणात उतरणार आहेत. भाजपने सुवेंदू अधिकारी यांना एकाच वेळी दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतून मैदानात उतरवले आहे.
भाजपची १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ममता बॅनर्जी यांच्याविरोधात सुवेंदू अधिकारी उतरणार रणांगणात
Published on

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने सोमवारी १४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात सुवेंदू अधिकारी हे रणांगणात उतरणार आहेत. भाजपने सुवेंदू अधिकारी यांना एकाच वेळी दोन महत्त्वाच्या मतदारसंघांतून मैदानात उतरवले आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सध्या भवानीपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. भाजपने याच हायप्रोफाइल जागेवर आपले ‘फायरब्रँड’ नेते सुवेंदू अधिकारी यांना उमेदवारी देऊन थेट आव्हान दिले आहे. यामुळे भवानीपूरमधील लढत आता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.

सुवेंदू अधिकारी फक्त भवानीपूरच नाही, तर आपल्या हक्काच्या ‘नंदीग्राम’ मतदारसंघातूनही निवडणूक लढवणार आहेत. नंदीग्राम हा अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो आणि तेथून ते सध्या विद्यमान आमदार आहेत. ममता बॅनर्जी आणि सुवेंदू अधिकारी यांच्यातील जुना राजकीय संघर्ष पाहता, भाजपने त्यांना दोन जागांवरून उमेदवारी देऊन तृणमूल काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.

पश्चिम बंगालमधील एकूण २९४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी १५२ जागांवर मतदान होईल. तर दुसऱ्या टप्प्यात २९ एप्रिल रोजी १४२ जागांवर मतदान होणार आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक १२ मार्च रोजी नितिन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. या बैठकीत १४४ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले, ज्यामध्ये ११ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

मुस्लिमबहुल असलेल्या मुर्शिदाबाद मतदारसंघातून भाजपने गौरी शंकर घोष यांना मैदानात उतरवले आहे. तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार हुमायूं कबीर येथे नवीन बाबरी मशीद बांधत असून त्यांनी आपला नवीन पक्षही स्थापन केला आहे, त्यामुळे या जागेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या वंशजालाही तिकीट

महान साहित्यिक बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंशज सौमित्र चॅटर्जी यांना नैहाटी येथून उमेदवार म्हणून नामांकित करण्यात आले आहे. घोषित उमेदवारांमध्ये ४१ विद्यमान आमदार आणि ३ माजी आमदारांचा समावेश आहे. भाजपने कालियागंजमधून बापन घोष, डायमंड हार्बरमधून दीपक कुमार हलदर, आसनसोल उत्तरमधून कृष्णेंदू मुखर्जी, हसनमधून निखिल बॅनर्जी, कूचबिहार उत्तरमधून सुकुमार रॉय आणि सिलिगुडीमधून शंकर घोष यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या पहिल्या यादीत जाहीर झालेल्या १४४ उमेदवारांपैकी ५७ उमेदवार व्यावसायिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतील आहेत.

logo
marathi.freepressjournal.in