भाजप जाहीरनाम्यात ‘मोदी की गॅरंटी’वर भर; संकल्पपत्रात केल्या 'या' प्रमुख घोषणा

लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पक्षाचा बहुप्रतीक्षित जाहीरनामा तथा ‘संकल्पपत्र’ घोषित केले.
भाजप जाहीरनाम्यात ‘मोदी की गॅरंटी’वर भर; संकल्पपत्रात केल्या 'या' प्रमुख घोषणा

नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पक्षाचा बहुप्रतीक्षित जाहीरनामा तथा ‘संकल्पपत्र’ घोषित केले. त्यामध्ये देशातील गरीब, युवक, शेतकरी आणि नारीशक्तीवर प्राधान्याने प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जग सध्या अनिश्चिततेच्या गर्तेत असताना पूर्ण बहुमताचे स्थिर सरकार ही गरज आहे, असे मोदी म्हणाले. ‘एक देश, एक निवडणूक’ या कल्पनेची अंमलबजावणी करण्यासाठी भाजप काम करील, समान नागरी संहिता देशहिताची आहे, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी पक्षाच्या जाहीरनाम्याच्या प्रती गरीब, युवक, शेतकरी आणि नारीशक्तीच्या प्रतिनिधींना दिल्या. निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला की त्वरित या जाहीरनाम्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केली जाईल. त्यामुळे हे संकल्पपत्र आपण ‘मोदी की गॅरंटी’ म्हणून देशवासीयांना सादर करीत आहोत, असे मोदी म्हणाले.

युवाशक्ती, नारीशक्ती, गरीब आणि शेतकरी हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ आहेत आणि त्यांना आमचे संकल्पपत्र सामर्थ्य देईल. गुंतवणुकीद्वारे रोजगार आणि दर्जेदार जीवनमान यावर आमचा प्रामुख्याने प्रकाशझोत राहील, असे ते म्हणाले. गेल्या १० वर्षांत भाजपने जाहीरनाम्यातील प्रत्येक आश्वासनांची अंमलबजावणी गॅरंटी म्हणून केली. तामिळनाडूत खाते उघडण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे, ही बाब लक्षात घेऊन मोदी यांनी जगभरात थिरुवल्लूवर सांस्कृतिक केंद्रे उभारण्याची घोषणा केली.

त्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मोदी की गॅरंटी ही २४ कॅरेट सोन्याप्रमाणे आहे. संकल्पपत्रासाठी देशभरातून १५ लाखांहून अधिक सूचना आल्या होत्या. त्यांचा जाहीरनाम्यात समावेश करण्यात आला आहे, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, यावेळी गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आदी नेते उपस्थित होते.

संकल्पपत्रातील प्रमुख घोषणा

- मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहणार.

- गरीबांना दिले जाणारे अन्न पौष्टिक, समाधानकारक आणि परवडणारे असेल.

- ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेच्या कक्षेत आणून ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार.

- गरीबांसाठी आणखी तीन कोटी घरे बांधणार.

- मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार

- तृतीयपंथी समुदायाला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार.

- गुंतवणुकीद्वारे जीवनमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्यांवर लक्ष देण्याचा प्रयत्न.

- घराघरांपर्यंत पाइपलाईनने गॅस पोहोचविणार.

- पीएम किसान योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार.

- सहकारातून समृद्धीच्या दृष्टिकोनातून भाजप राष्ट्रीय सहकार धोरण आणणार.

- देशभरातील दुग्धव्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्याही वाढवण्यात येणार.

- पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल.

- जेनेरिक औषधांची केंद्रे आणखी वाढवण्यात येणार.

- उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षापर्यंत वाढविण्यात येणार.

- महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार.

- कोट्यवधी लोकांचे वीजबिल शून्य करण्यावर भर देण्यात येणार.

- कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार.

- महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार.

- ३ कोटी महिलांना लखपती करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार.

भाजपचा जाहीरनामा म्हणजे जुमलापत्र - खर्गे

भाजपने रविवारी जाहीर केलेले संकल्पपत्र म्हणजे जुमलापत्र असून त्यामध्ये केवळ अलंकारिक भाषा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता करण्यास ते असमर्थ ठरले आहेत. मोदी यांची गॅरंटी म्हणजे जुमल्यांची वॉरंटी आहे, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर केली आहे. रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि महागाई नियंत्रणात आणणे याबाबत मोदी यांनी काहीच केले नाही. १० वर्षांच्या कारकीर्दीत जनता, युवक आणि शेतकरी यांना लाभ होईल असे कोणतेही कार्य मोदी यांनी केलेले नाही, असेही खर्गे म्हणाले. मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्वासन दिले होते.

प्रत्यक्षात त्यांनी निवडणूक रोखे आणले. ईशान्य भारतात कायदा-सुव्यवस्थेचे आश्वासन त्यांनी दिले होते, मात्र मणिपूर अद्यापही धुमसतच आहे आणि मोदींनी त्याबाबत मौन पाळले आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in