महाराष्ट्रात भाजपचे धक्कातंत्र; ४ विद्यमान खासदारांचा पत्ता कापला; ७२ जणांची दुसरी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ७२ उमेदवारांची दुसरी यादी दिल्लीहून जाहीर केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात भाजपचे धक्कातंत्र; ४ विद्यमान खासदारांचा पत्ता कापला; ७२ जणांची दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली/मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने ७२ उमेदवारांची दुसरी यादी दिल्लीहून जाहीर केली. भाजपच्या दुसऱ्या यादीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्रातील २० जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत चार विद्यमान खासदारांचा पत्ता कापत नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. पंकजा मुंडे, पियुष गोयल, मिहिर कोटेचा आणि स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातून दिल्लीत जायची इच्छा नसलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना देखील चंद्रपूरमधून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या आतापर्यंतच्या २० उमेदवारांच्या यादीत ५ महिलांना स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत नितीन गडकरी यांचे नाव नव्हते. त्यावरून विरोधकांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. उद्धव ठाकरे यांनी तर नितीन गडकरींना महाविकास आघाडीची ऑफर दिली होती. युतीच्या चर्चा सुरू असल्याने पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही नाव नाही. दुसरी यादी जेव्हा जाहीर होईल तेव्हा गडकरींचे नाव पहिले असेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार नितीन गडकरी यांचे नाव यादीत आहे. भाजपने यावेळी चार विद्यमान खासदारांचा पत्ता कापला आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्या पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करताना त्यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांचा पत्ता कापण्यात आला आहे. जळगावात भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. स्मिता वाघ भाजपच्या विधान परिषदेच्यादेखील आमदार होत्या. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे तिकीट कापत त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन मनोज कोटक यांना धक्का देण्यात आला आहे.

पंकजा मुंडे यांना दिल्लीसाठी संधी देतानाच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना देखील चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार हे लोकसभेसाठी इच्छुक नव्हते. त्यांना राज्यातच काम करण्याची इच्छा होती. मात्र, आता पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार यांना दिल्लीत जाण्याची संधी पक्षाने दिली आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांना संधी देण्यात आली आहे. रक्षा खडसे या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. स्मिता वाघ या देखील खडसे समर्थक मानल्या जातात. अकोला मतदारसंघातून अनूप धोत्रे यांना संधी देण्यात आली आहे. अनूप धोत्रे हे अकोल्याचे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे चिरंजीव आहेत.

नंदुरबारमधून हीना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. हीना गावित या तेथील विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे त्यांना यावेळी हॅटट्रिक करण्याची संधी आहे. धुळे मतदारसंघातून सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. अहमदनगर येथून डॉ.सुजय विखे पाटील यांना अपेक्षेनुसारच पुन्हा संधी देण्यात आली आहे. वर्ध्यातून रामदास तडस, दिंडोरीतून भारती पवार, जालन्यातून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महाराष्ट्रातील उमेदवार : १) चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार, २) रावेर - रक्षा खडसे, ३) जालना- रावसाहेब दानवे, ४) बीड- पंकजा मुंडे, ५) पुणे- मुरलीधर मोहोळ, ६) सांगली - संजयकाका पाटील, ७) माढा- रणजीत निंबाळकर, ८) धुळे - सुभाष भामरे, ९) उत्तर मुंबई- पीयूष गोयल, १०) उत्तर पूर्व- मिहीर कोटेचा, ११) नांदेड- प्रतापराव चिखलीकर, १२) अहमदनगर- सुजय विखे पाटील, १३) लातूर- सुधाकर श्रृंगारे, १४) जळगाव- स्मिता वाघ, १५) दिंडोरी- भारती पवार, १६) भिवंडी- कपिल पाटील, १७) वर्धा - रामदास तडस, १८) नागपूर- नितीन गडकरी, १९) अकोला- अनुप धोत्रे, २०) नंदुरबार- डॉ. हीना गावित

भाजपकडून पाच महिलांना संधी

भाजपच्या २० जणांच्या यादीत पाच महिलांना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे, रक्षा खडसे, स्मिता वाघ, भारती पवार आणि डॉ. हीना गावित या पाच महिलांना भाजपने संधी दिली आहे. पुढील यादीत आणखीही महिला उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

तीन माजी मुख्यमंत्री खट्टर, बोम्मई, रावत रिंगणात

भाजपच्या ७२ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रासह दिल्ली, हरयाणा, कर्नाटक, उत्तराखंड, गुजरात, तेलंगण, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव येथील काही उमेदवार जाहीर केले आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर माजी केंद्रीय मंत्री सदानंद गौडा आणि रमेश पोखरीयाल निशंक यांचा पत्ता कापण्यात आला आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रिसंह रावत यांना अनुक्रमे हावेरी आणि हरिद्वार मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते अनिल बलुनी हे प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना गढवाल मतदारसंघातून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांचा पत्ता कापून तिकीट देण्यात आले आहे. कर्नाटकमधून तेजस्वी सूर्या यांना बंगळुरू-दक्षिण मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे, तर केंद्रीय मंत्री शोभा करांदलाजे यांना बंगळुरू-उत्तर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना धारवाडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्ली-पूर्व मतदारसंघातून हर्ष मल्होत्रा आणि दिल्ली उत्तर-पश्चिम मतदारसंघातून योगेंद्र चंडोलिया या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in