
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुमारे १,४९४ कोटी रुपये खर्च केले, जो एकूण निवडणूक खर्चाच्या ४४.५६ टक्के इतका आहे, अशी माहिती निवडणूक सुधारणा क्षेत्रातील संस्था ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने (एडीआर) शुक्रवारी दिली.
राष्ट्रीय पक्षांचा खर्च २,२०४ कोटी रुपये (६५.७५ टक्के) इतका होता. ‘एडीआर’च्या अहवालानुसार, राष्ट्रीय पक्षांनी ६,९३०.२४६ कोटी रुपये (९३.०८ टक्के) निधी जमा केला, तर प्रादेशिक पक्षांनी केवळ ५१५.३२ कोटी रुपये (६.९२ टक्के) गोळा केले. हा अभ्यास निवडणूक आयोगाकडे पक्षांनी अनिवार्यपणे सादर करावयाच्या खर्चाच्या निवेदनांवर आधारित आहे, जे सामान्य निवडणुकीनंतर ९० दिवसांत आणि राज्य निवडणुकीनंतर ७५ दिवसांत द्यावे लागतात.
काँग्रेसचा दुसरा क्रमांक
काँग्रेसने यानंतर दुसरा क्रमांक पटकावला असून त्यांनी ६२० कोटी रुपये खर्च केले, जो एकूण खर्चाच्या १८.५ टक्के आहे. ही आकडेवारी ३२ राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या खर्चाच्या अहवालावर आधारित आहे. या पक्षांनी एकत्रितपणे ३,३५२.८१ कोटी रुपये खर्च केले, ज्यामध्ये लोकसभा निवडणुका तसेच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओदिशा आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुकीतील खर्चाचा समावेश आहे. पण ‘एडीआर’ने नमूद केले की, आप पक्षाने १६८ दिवस उशिरा, तर भाजपने १३९ ते १५४ दिवसांनंतर आपले खर्च निवेदन सादर केले. फक्त काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे एकत्रित निवेदन सादर केले. प्रचार खर्चात सर्वाधिक पैसा गेला. पक्षांनी २,००८ कोटी रुपये (५३ टक्क्यांपेक्षा जास्त) प्रचारावर खर्च केले. त्यानंतर प्रवास खर्च ७९५ कोटी रुपये, तर उमेदवारांना दिलेले एकरकमी पैसे ४०२ कोटी रुपये होते. व्हर्च्युअल प्रचारावर १३२ कोटी रुपये व उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या प्रसिद्धीवर २८ कोटी रुपये खर्च झाले.
एकूण प्रचार खर्चापैकी, राष्ट्रीय पक्षांनी १,५११.३० कोटी रुपये (७५.२५ टक्के) खर्च केले, तर प्रादेशिक पक्षांनी ४९६.९९ कोटी रुपये (२४.७५ टक्के) खर्च केले. प्रवास खर्चातही प्रख्यात प्रचारकांवर भर दिसून आला. एकूण ७९५ कोटींपैकी ७६५ कोटी रुपये (९६.२२ टक्के) स्टार प्रचारकांवर खर्च करण्यात आले, इतर नेत्यांवर केवळ ३० कोटी रुपयेच खर्च झाले.