'जी-२०'चे यश भाजप निवडणुकीपूर्वी घराघरात पोहचवणार!

भाजपने राष्ट्रीय नेते आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत
'जी-२०'चे यश भाजप निवडणुकीपूर्वी घराघरात पोहचवणार!
Published on

नवी दिल्ली : जी-२० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी आयोजन करत भारताने जगभर दबदबा निर्माण केला आहे. ही परिषद यशस्वीपणे पार पाडण्यासाठी केंद्र सरकारच्या सर्व विभागांनी विशेष परिश्रम घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजनाबाबत स्वत: सतत आढावा घेतला. 'जी-२०'चे यश देशासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. याचाच लाभ घेण्याचे भाजपने ठरवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा जगभर निर्माण केलेला दबदबा हा प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जागतिक नेत्यांशी असलेले संबंध आणि प्रत्येक मुद्द्यावर आपले मत खास शैलीत मोठ्या धैर्याने मांडण्याचे कौशल्य हे भारताच्या यशाचे गमक आहे. यामुळेच सध्या जगभर भारताचा बोलबाला आहे. जागतिक स्तरावर मोदींना मिळलेल्या या लोकप्रियतेचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोठ्या खुबीने उपयोग करण्याची योजना भाजपने आखली जात आहे. भारतात जी-२० शिखर परिषद आयोजित करणे ही जागतिक स्तरावर देशासाठी एक मोठी संधी होती. हे यश देशातील प्रत्येक गावात आणि घराघरात नेण्याचा निर्धार भाजपने केला आहे. या संदर्भात भाजपने राष्ट्रीय नेते आणि बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांवर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.

प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही जी-२० शिखर परिषदेच्या यशाचा प्रसार केला जाणार आहे. देशातील महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे होर्डिंग लावून यशाची गाथा सांगण्याची तयारी सुरू केली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी आघाडीवर असल्याचे मत भाजपने देशातील जनतेसमोर मांडण्याची तयारी केली आहे. भारताचे भवितव्य केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे, हेही भारतीय जनतेवर बिंबवले जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in