
जयपूर : काँग्रेस सरकारने राजस्थानमध्ये ज्या कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत, त्या भाजप सत्तेवर आल्यास थांबवील, भाजप लक्षाधीशांना मदत करेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चुरू जिल्ह्यातील तारानगर येथील एका प्रचारसभेत बोलताना सांगितले.
काँग्रेसने सुरू केलेल्या पेन्शन योजना, आरोग्य विमा योजना, सवलतीमधील गॅस सिलिंडर, महिलांना वार्षिक १० हजार रुपयांचे सहाय्य हे सर्व भाजप सत्तेवर आल्यास थांबवेल आणि पुन्हा ते श्रीमंतांना मदत करेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘हमी’वरही त्यांनी ताशेरे ओढले. मोदींची हमी म्हणजे अदानींसाठी हमी, तर काँग्रेस म्हणजे शेतकरी, मजूर आणि तरुणांचे सरकार. हा फरक आहे. तुम्हीच ठरवायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.