चंदिगडच्या वरिष्ठ उपमहापौरपदी भाजपचे संधू; आप-काँग्रेसला धक्का

वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याने आप व काँग्रेस आघाडीला मोठा धक्का
चंदिगडच्या वरिष्ठ उपमहापौरपदी भाजपचे संधू;  आप-काँग्रेसला धक्का
Published on

चंदिगड : चंदिगडच्या महापौरपदासाठी जानेवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. हा निकाल २० फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून त्याऐवजी आप-काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला विजयी घोषित केले होते. मात्र, चंदिगडच्या वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्याने आप व काँग्रेस आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

चंदिगड महापौरपदाच्या निवडणुकीत आप-काँग्रेस आघाडीचे पराभूत झालेले उमेदवार कुलदीपकुमार यांना सर्वोच्च न्यायालयाने विजयी घोषित केले होते. आता सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपचे कुलजीतसिंग संधू आणि राजिंदर शर्मा हे अनुक्रमे वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौर म्हणून विजयी झाले आहेत. भाजपच्या या दोघा उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला.

महापौर हे वरिष्ठ उपमहापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून काम पाहात असल्याने पुन्हा निवडणूक घेण्यात आली. संधू हे वरिष्ठ उपमहापौर म्हणून, तर शर्मा हे उपमहापौर म्हणून निवडून आले. या दोघांना समान म्हणजे १९ मते मिळाली.

काँग्रेसचे उमेदवार गुरप्रीत गाबी आणि निर्मलादेवी यांना अनुक्रमे १६ आणि १७ मते मिळाली. ते अनुक्रमे वरिष्ठ उपमहापौर, उपमहापौरपदाच्या निवडणूक रिंगणात होते. किरण खेर या चंदिगडच्या भाजप खासदार असून त्यांनाही मतदानाचा अधिकार होता.

logo
marathi.freepressjournal.in