
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष खरे ठरवत भाजपच्या हाती तब्बल २७ वर्षांनी सत्तेचे सोपान दिले. गेल्या जवळपास १५ वर्षांपासून सत्तारूढ असलेल्या आम आदमी पार्टीच्या (आप) अभेद्य भिंतीला मतदारांनी चांगलेच भगदाड पाडले. इतकेच नव्हे, तर पक्षाचे चार मजबूत खांबही उखडून टाकले. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह सोमनाथ भारती, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांच्यासारख्या दिग्गजांना मतदारांनी पराभवाची चव चाखावयास लावली. विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांचा झालेला विजय हीच आपच्या भळभळत्या जखमेवरील फुंकर ठरली. त्यांच्यासोबत गोपाळ राय, मुकेश अहलावत आणि इम्रान हुसेन हे विद्यमान मंत्री विजयी झाले आहेत. काँग्रेसला गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही भोपळा फोडता आला नाही.
दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले, तर मतमोजणी शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी झाली. दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ जागांवर विजय मिळवत भाजपने जोरदार मुसंडी मारली आणि सत्तारूढ आपला केवळ २२ जागांवरच समाधान मानावे लागले. काँग्रेस आणि इतर पक्षांना आपले खातेही उघडता आले नाही. दिल्लीत १ कोटी ५६ लाख मतदार असून १३ हजार ७६६ मतदार केंद्रांत मतप्रक्रिया पार पडली. येथे ७० जागांसाठी ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
सत्तास्थापनेला वेग
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना आता राजधानीत वेग आला आहे. भाजपचे परवेश वर्मा आणि तरविंदरसिंग हे जायंटकिलर ठरले आहेत. त्यांनी अनुक्रमे अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा पराभव केला. वर्मा हे दक्षिण दिल्ली मतदारसंघातून दोनदा खासदार होते. त्यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच केजरीवाल यांच्याविरुद्ध प्रचार सुरू केला होता. या विजयामुळे ते केवळ जाट समाजाचे नेतेच म्हणून पुढे आले नाहीत, तर मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार म्हणूनही त्यांनी आपले स्थान अधिक बळकट केले आहे. परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांचे पुत्र आहेत.
भ्रष्टाचाराचा 'शिश महल' उद्ध्वस्त - अमित शहा
दिल्लीच्या हृदयात नरेंद्र मोदी आहेत. दिल्लीच्या जनतेने खोटारडेपणा, धोकेबाजी आणि भ्रष्टाचाराचा 'शिश महल' उद्ध्वस्त करत दिल्लीला संकटमुक्त केले आहे. जे लोक दिलेली आश्वासने पाळत नाहीत, अशा लोकांना दिल्लीच्या जनतेने धडा शिकवला आहे, असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लगावला आहे.
एसआयटी स्थापन करणार - वीरेंद्र सचदेव
दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होताच पहिल्या मंत्रिमंडळातच एसआयटी स्थापन केली जाईल आणि आप सरकारच्या सर्व घोटाळ्यांची चौकशी केली जाईल, असे भाजप नेते वीरेंद्र सचदेव यांनी म्हटले आहे.
केजरीवाल पराभूत, आतिशी विजयी
निवडणुकीत संदीप दीक्षित, अलका लांबा आणि रमेश बिधुरी या दिग्गजांनाही पराभव पत्करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे ४०८९ मतांनी, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया ६७५ मतांनी पराभूत झाले, तर विद्यमान मुख्यमंत्री आतिशी या ३५२१ मतांनी विजयी झाल्या.
दिल्ली सचिवालय ‘सील’!
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल यांचा निवडणुकीत पराभव होताच नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने दिल्ली सचिवालयात पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारी कागदपत्रे आणि डेटा संरक्षित करण्यास सांगितले आहे. गेल्या १० वर्षांपासून दिल्लीवर आपची एकहाती सत्ता होती. या काळात कोणकोणते निर्णय घेतले, काय काय उद्योग केले याच्या फाइल बाहेर जाऊ नयेत म्हणून नायब राज्यपालांनी दिल्ली सचिवालय सील करण्याचे आदेश दिले आहेत. सक्सेना यांच्या निर्देशानंतर दिल्लीच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश काढला आहे. सामान्य प्रशासन विभागाने आदेशात, विभागाच्या परवानगीशिवाय फाइल, कागदपत्रे, संगणक हार्डवेअर इत्यादी सचिवालयाच्या बाहेर नेले जाऊ शकत नाही. सर्व विभाग, एजन्सी आणि मंत्री परिषदेच्या कॅम्प ऑफिसना विभागाच्या परवानगीशिवाय कोणतेही रेकॉर्ड किंवा फाइल्स हटवू नयेत, असे जाहीर केले आहे.
भाजपसाठी काय फायदेशीर ठरले?
आरएसएस आणि अन्य संघटनांचे भक्कम मैदानात काम. प्रचाराच्या मागे संघटनात्मक बळ मोठ्या प्रमाणावर कार्यरत होते.
मध्यमवर्गाला आकर्षित करण्यासाठी अर्थसंकल्पातील करसवलतीचा प्रभावी वापर.
रस्ते, पाणीपुरवठा, प्रदूषण आणि बंद पडलेली मोहल्ला क्लिनिक्स यांसारख्या मुद्द्यांवर भाजपने भर दिला.
आपसाठी काय नुकसानदायक ठरले?
साधी राहणी आणि प्रामाणिक राजकारण या आपच्या प्रतिमेला नेत्यांच्या ऐषआरामाच्या जीवनशैलीमुळे तडा गेला.
भ्रष्टाचाराचे आरोप आणि दारू घोटाळ्यातील अडकलेले मंत्री यामुळे आपचे स्वच्छ राजकारण प्रतिमान मोठ्या प्रमाणावर ढासळले.
विविध मुद्द्यांवर केंद्राशी टोकाची संघर्षाची भूमिका घेतल्याने मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली.
अहंकारामुळे आपचा शेवट - पंतप्रधान
दिल्ली निवडणुकीत मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. या विजयाने अराजकता, अहंकार आणि आपचाही शेवट झाला. दिल्लीकरांनी आमच्यावर मनापासून प्रेम केले. त्याचे कर्ज आम्ही विकासाच्या रूपाने परत देऊ. राजकारणात शॉर्टकटसाठी, भ्रष्टाचारासाठी, खोट्या गोष्टींसाठी मुळीच जागा नाही.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
सुरुवातीला ‘तो’ बरा वागला... - अण्णा हजारे
दारू, पैशांच्या लोभापायी केजरीवाल यांचा त्यांच्या पक्षाचा पराभव झाला. मी अनेक काळापासून सांगतोय, निवडणूक लढताना उमेदवारांकडे चारित्र्य असायला हवे, चांगले विचार हवेत, उमेदवाराच्या छबीवर कोणताही डाग असायला नको. मात्र त्यांना लक्षातच आले नाही. ते दारू आणि पैशात गुरफटून गेले.
- समाजसेवक अण्णा हजारे
‘आप’ला जिंकून देणे ही आमची जबाबदारी नाही - काँग्रेस
काँग्रेस पक्षाच्या सोबत आप असता तर असा निकाल लागला नसता, असे आप आणि इंडिया आघाडीतील मित्रपक्षांकडून वारंवार सांगण्यात येत आहे, असे विचारले असता काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, आम आदमी पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी आम्ही उचललेली नाही. आम्ही काही एनजीओ नाही आहोत. आम्हीदेखील एक राजकीय पक्ष आहोत, असे श्रीनेत यांनी सांगितले.
विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावू - केजरीवाल
आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले. त्यात त्यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, मी भाजपला विजयाच्या शुभेच्छा देतो. मी अशी अपेक्षा करतो की, दिल्लीच्या जनतेने भाजपला ज्या गोष्टींसाठी मते दिली आहेत ती विधायक कामे भविष्यात भाजपकडून नीट पार पाडली जातील. गेल्या १० वर्षांत आमच्या पक्षाने प्रत्येक क्षेत्रात कार्यरत राहून दिल्लीचा विकास केला, असेही ते म्हणाले.