

अहमदाबाद : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजपने कटकारस्थान रचून जिंकल्याचा आरोप लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी येथे केला. तसेच आम्ही जातीआधारित जनगणना करण्याची मागणी केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती मान्य केली नाही. आम्ही सत्तेत आलो की जातीआधारित जनगणेचा कायदा मंजूर करू, असे राहुल गांधी म्हणाले. अहमदाबाद येथे पक्षाच्या अधिवेशनात ते बोलत होते.
येणाऱ्या काळात देशात बदल घडणार आहे. लोकांचे मत बदलत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मला फक्त माझ्या कामात रस आहे, लोक काय म्हणतात, याने मला काहीही फरक पडत नाही. तेलंगणात आम्ही क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. तेथे आम्ही जातनिहाय जनगणना करीत आहोत. काही महिन्यांपूर्वी मी संसदेत एक भाषण केले होते. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करावी, अशी मी मोदींकडे मागणी केली होती. या देशात दलित किती आहेत, मागास किती आहेत, मुस्लिम किती आहेत, आदिवासी किती आहेत, हे समजले पाहिजे, असे मी म्हणालो होतो. देशाचा ‘एक्स-रे’ काढला पाहिजे, अशी मागणी मी केली होती.पण मोदीजी, आरएसएसने आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले, असे ते म्हणाले.
अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या काठावर काँग्रेस अधिवेशनात खर्गे म्हणाले, संघटनेच्या जडणघडणीत जिल्हाध्यक्षांची भूमिका महत्त्वाची असेल म्हणूनच त्यांची नियुक्ती एआयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काटेकोरपणे आणि निष्पक्षपणे केली पाहिजे. जिल्हाध्यक्षांनी नियुक्ती झाल्यापासून एका वर्षाच्या आत सर्वोत्तम लोकांचा समावेश करुन बुथ कमिटी, मंडल कमिटी, ब्लॉक कमिटी आणि जिल्हा कमिटी तयार करावी. यामध्ये कोणताही पक्षपात नसावा, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षांना सहभागी करणार
खर्गे पुढे म्हणाले की, आम्ही देशभरातील जिल्हाध्यक्षांच्या तीन बैठकाही बोलावल्या. मी आणि राहुल गांधी यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांचे मत जाणून घेतले. भविष्यात आम्ही निवडणुकीसाठी उमेदवार निवड प्रक्रियेत जिल्हाध्यक्षांना सहभागी करून घेणार आहोत. जे पक्षाच्या कामात मदत करत नाहीत, दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत, त्यांनी निवृत्त व्हावे, असे खर्गे म्हणाले.
आपण पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत. स्वातंत्र्याच्या या दुसऱ्या लढाईत पुन्हा अन्याय, असमानता, भेदभाव, गरिबी आणि सांप्रदायिकता शत्रू आहेत. फरक एवढाच आहे की पूर्वी परदेशी लोक अन्याय, गरिबी आणि असमानतेला प्रोत्साहन देत होते, आता आपले स्वतःचे सरकार ते करत आहे. पूर्वी परदेशी लोक जातीयवादाचा फायदा घेत असत, आज आपलेच सरकार त्याचा फायदा घेत आहे. पण आपण ही लढाई देखील जिंकू, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
महाराष्ट्रातील निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा खर्गे
संपूर्ण जग ईव्हीएमपासून मतपत्रिकेच्या दिशेला जात आहे. पण आपल्या देशात ईव्हीएमचा वापर केला जात आहे ही सर्व फसवणूक आहे. ईव्हीएमचा वापर बंद केला पाहिजे. भारतातही मतपत्रिकेने निवडणुका व्हायला पाहिजेत, अशी मागणी करतानाच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आणि त्यांनी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली. ‘महाराष्ट्रात ५५ लाख मतदार कसे वाढले’, असा सवालही त्यांनी केला.
मी कोठेही ऐकले नाही, कोठेही पाहिलेही नाही. भाजप इथे १५० जागा लढवते आणि त्यापैकी १३८ जागांवर जिंकून येतात. ९० टक्के निकाल, इतका मोठा निकाल या देशात कधी पाहिला आहे का, आम्ही देखील अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. मी सुद्धा १२ ते १३ निवडणुका लढलो आहे. असे कधीच झाले नाही. जो घोटाळा महाराष्ट्रात झाला तो फक्त लोकशाहीला नष्ट करण्यासाठी केला, तसेच विरोधकांचा पराभव करण्यासाठी केला आहे. आपल्याला या विरोधात लढायचे आहे, असे खर्गे म्हणाले.
खर्गेंचा ईव्हीएमवरुन सरकारवर निशाणा
अरे तुम्ही असे तंत्रज्ञान बनवले आहे की ज्याने तुम्हाला फायदा होईल, विरोधकांना नुकसान होईल, असे तंत्रज्ञान बनवून आमचा पराभव करत असाल तर आज किंवा उद्या या देशाचे तरुण नक्की या विरोधात लढा देतील. तुमचा हात पकडून ते सांगतील आम्हाला मतपत्रिका पाहिजे, ईव्हीएम नको, असेही ते म्हणाले.
मोदी देश विकून टाकतील!
देश सध्या एकाधिकारशाहीकडे जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची संपत्ती हे सरकार आपल्या श्रीमंत मित्रांकडे हस्तांतरित करीत आहे. ज्याप्रकारे सार्वजनिक क्षेत्रांचे उपक्रम त्यांच्या मित्रांकडे सोपवले जात आहेत, ते पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी एकेदिवशी आपला देश विकून टाकतील आणि ते दिवस दूर नाहीत. सरकारची संपत्ती त्यांच्या श्रीमंत मित्रांच्या हातात दिली जात आहे, असा आरोपही खर्गे यांनी केला.
‘पक्षाची कामे करावयाची नसतील तर निवृत्ती घ्या’
गुजरातमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून त्या अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना कडक संदेश दिला आहे. पक्षाची कामे न करणारे अथवा दिलेली जबाबदारी योग्यरित्या न पार पाडणाऱ्यांनी निवृत्ती घ्यावी, असे खर्गेंनी स्पष्टपणे सांगितले.
निवडणूक आयोगाकडून यादी मागून आम्ही थकलो!
देश आता कंटाळला आहे, तुम्ही बघा बिहारच्या निवडणुकीत काय होते, भाजपने महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकली हे तुम्ही तिथे जाऊन लोकांना विचारा. आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी विचारत आहोत. ही यादी मागून आम्ही थकलो आहोत. पण अजूनही निवडणूक आयोग आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची यादी देत नाही, असा आरोपही गांधी यांनी केला.