

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लक्ष्य करीत त्यांचा संबंध अमेरिकास्थित अब्जाधीशाशी जोडण्याचा प्रयत्न गुरुवारी लोकसभेत भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला. त्याला काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार हरकत घेतल्याने सभागृहात गोंधळ होऊन लोकसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले.
संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांची वर्तणूक स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे. रंगीबेरंगी कपडे परिधान करून विरोधक संसदेत आले आणि फॅशन-शो सुरू केला आहे. यामुळे संसदेची प्रतिष्ठा खालावते, त्याचा आपण निषेध करतो, असे रिजिजू म्हणाले. अशा प्रकारच्या वर्तणुकीमुळे काहीच हाती लागणार नाही. त्यामुळे मतेही मिळणार नाहीत, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या यशोगाथेचे महत्त्व कमी करण्याचा काँग्रेस प्रयत्न करीत आहे, असे निशिकांत दुबे म्हणाले.
महाभ्रष्टाचाराच्या समूहाची कृत्ये चव्हाट्यावर आणणाऱ्यांची बदनामी करण्याचे काम अदानींच्या हस्तकांकडे सोपविण्यात आले आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी यांना संभलला जाण्यापासून रोखण्यात आले. त्यावरून संपूर्ण विरोधी पक्ष आवाज उठवित असताना बिर्ला यांनी दुबे यांना शून्यप्रहरात बोलण्याची संधी दिली हे दुर्दैवी आहे, असे काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाळ म्हणाले.
‘मोदी-अदानी एक है, अदानी सेफ है’ची जाकिटे परिधान करून विरोधकांची निदर्शने
‘मोदी-अदानी एक है, अदानी सेफ है’ असा मजकूर असलेले स्टिकर्स लावलेली जाकिटे परिधान करून गुरुवारी इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी संसद संकुलामध्ये घोषणाबाजी केली आणि अदानी प्रश्नावर संयुक्त संसदीय समितीद्वारे (जेपीसी) चौकशीची मागणी केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आपल्या पारंपरिक पांढऱ्या टी-शर्टवरही स्टिकर लावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्योगपती गौतम अदानी यांची चौकशी करू शकत नाही, कारण तसे झाले तर मोदी यांची स्वत:विरुद्धचीच ती चौकशी ठरेल, असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसच्या सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी-वढेरा, राजद आणि डाव्या पक्षांचे लोकप्रतिनिधी निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.
त्यानंतर निदर्शने करणाऱ्या खासदारांनी संविधान सदनासमोर रांगेत उभे राहून मोदी आणि अदानी यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. अदानीविरोधातील निदर्शनांपासून तृणमूल काँग्रेस मात्र दूर राहिली होती. अमेरिकेतील न्यायालयाने अदानी यांच्यावर ठपका ठेवल्यानंतर राहुल गांधी यांनी अदानी यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली होती.
राहुल गांधी देशद्रोही : भाजपच्या नेते संबित पात्रा यांचा आरोप
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा देशविरोधी शक्तींशी संबंध असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने गुरुवारी केला. फ्रेंच माध्यम 'मीडियापार्ट'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्ताचा हवाला देत भाजप खासदार संबित पात्रा यांनी दावा केला की, भारताला अस्थिर करणाऱ्या माध्यमांसह आंतरराष्ट्रीय शक्तींशी राहुल गांधींचा संबंध आहे, राहुल गांधी देशद्रोही असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संबित पात्रा म्हणाले, जेव्हा तुमच्याकडे बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नसतो, तेव्हा तुम्ही स्वतःचे मुद्दे तयार करून देशाच्या विरोधात अशा प्रकारचे मुद्दे निर्माण करता आणि जागतिक स्तरावर देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातो. राहुल गांधी हेच करत आहेत, म्हणूनच मी त्यांना देशद्रोही म्हटले. जे लोक वस्तुस्थितीच्या आधारे नव्हे, तर खोटे बोलून देशाची बदनामी करतात त्यांना देशद्रोही नाही, तर काय म्हणायचे, राहुल गांधी देशद्रोही आहेत, असे म्हणण्यास मला अजिबात संकोच वाटत नाही, अशी टीका पात्रांनी केली.
अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस, अमेरिकास्थित संस्था 'ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट' (ओसीसीआरपी) आणि राहुल गांधी यांचे त्रिकुट भारताला अस्थिर करण्याचा आणि शासन बदलासाठी लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पात्रा यांनी केला. पात्रा म्हणाले की, ‘ओसीसीआरपी’चे अनेक खंडांमध्ये ५० हून अधिक मीडिया पार्टनर आहेत आणि ते त्यांच्या कामासाठी निधी देण्यासाठी जॉर्ज सोरोस आणि अमेरिकेतील भारतविरोधी शक्तींवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. जर त्यांना ७० टक्के संसाधने एकाच स्रोताकडून मिळत असतील तर ते तटस्थ राहू शकत नाहीत.
दुबेंनी माफी मागावी, काँग्रेसची मागणी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि परकीय गुंतवणूकदार यांच्यात संबंध असल्याचा आरोप करणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यावर काँग्रेसने गुरुवारी जोरदार हल्ला चढविला. दुबे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे आणि माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली.