
हैदराबाद : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्ष आता घार्इ करु लागले असून भाजपने देखील तेलगंणाव विधानसभेतसाठी आपल्या ५२ उमेदवारांची पहिली यादी रविवारी जाहीर केली. मध्य प्रदेश आणि राजस्थानप्रमाणे तेलंगणात देखील भाजपने तीन खासदारांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवले आहे. तेलंगणा राज्यात ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक होणार असून ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
भाजपने तेलंगणाचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याविरोधात त्यांच्याच भारत राष्ट्र समितीचे माजी सदस्य इटाळा राजेंदर यांना उमेदवारी दिली आहे. तसेच या उमेदवारांमध्ये मोहम्मद प्रेषित यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे टी राजा यांना गोशामहल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राजेंदर इटाळा हे हुजुराबाद आणि गजवेल या दोन मतदारसंघांतून रिंगणात उतरणार आहेत. इटाळा हे भारत राष्ट्र समिती पक्षाचे सदस्य होते. पण, आता गजवेल मतदारसंघात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात भिडणार आहेत.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, खासदार संजय कुमार बंदी करीमनगरमधून, खासदार सोयम बापू रावांना बोथ येथून आणि अरविंद धर्मापुरींना कोरतला मतदारसंघातून उमेदरवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. तेव्हा ही नावे निश्चित करण्यात आली आहेत. काँग्रेसने १५ ऑक्टोरला ५५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यात प्रदेशाध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी यांना कोडंगलमधून आणि माजी प्रदेशाध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांना हुजूरनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
टी राजा सिंग यांचे निलंबन रद्द
उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वी भाजपने गोशा महल येथील आमदार टी राजा सिंग यांचे निलंबन रद्द केले. गेल्या वर्षी ऑगस्ट २०२२ मध्ये प्रेषित मोहम्मदाविषयी एक व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित करुन भाष्य केल्या प्रकरणी पक्षाने या आमदाराला पक्षातून निलंबित केले होते. भाजच्या केंद्रीय शिस्तपालन समितीने टी राज सिंग यांचे निलंबन मागे घेतले. सिंग यांनी दिलेले स्पष्टिकरण मान्य करुन त्यांचे निलंबन रद्द करण्यात आल्याची माहीती भाजपकडून देण्यात आली.