पहिल्या यादीनंतर भाजपला धक्के; अभिनेता पवन सिंहची माघार, तर हर्षवर्धन यांचा राजकारण संन्यास

भाजपने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
पहिल्या यादीनंतर भाजपला धक्के; अभिनेता पवन सिंहची माघार, तर हर्षवर्धन यांचा राजकारण संन्यास

कोलकाता : भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार पवन सिंह यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. काही वैयक्तिक कारणास्तव आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी ‘एक्स’वरून जाहीर केले आहे. त्याचबरोबर दिल्लीमधील चांदणी चौकचे खासदार आणि माजी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आगामी लोकसभेसाठी भाजपने तिकीट कापल्यानंतर थेट राजकारणातूनच संन्यास घेतला आहे. त्यामुळे पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पुढच्याच दिवशी सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे.

भाजपने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. सध्या तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे आसनसोलचे विद्यमान खासदार आहेत. तृणमूलकडून त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याने शत्रुघ्न सिन्हाविरोधात भाजपने भोजपुरी अभिनेते आणि गायक पवन सिंह यांना उमेदवारी दिली होती. पण “मी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मनापासून आभार व्यक्त करतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. मात्र, काही कारणामुळे मी ही निवडणूक लढवू शकणार नाही,” असे पवन सिंह यांनी रविवारी जाहीर केले. निवडणूक होण्याआधीच पश्चिम बंगालमधून भाजपच्या एका उमेदवाराने माघार घेतली. बंगालमधील लोकांच्या ताकदीमुळेच पवन सिंह यांना माघार घ्यावी लागली, अशा शब्दांत तृणमूलने भाजपवर निशाणा साधला.

भाजपने शनिवारी दिल्लीतील पाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये चांदणी चौक येथून प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट देण्यात आले आहे. डॉ. हर्षवर्धन हे याच मतदारसंघातून पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले होते. तिकीट नाकारल्यानंतर आता राजकारणातून संन्यास घेत डॉ. हर्षवर्धन यांनी भाजपचे आभार मानले. ते म्हणाले की, “३० वर्षे माझी अतिशय सुरेख अशी राजकीय कारकीर्द राहिली. पाच वेळा विधानसभा आणि दोन वेळा लोकसभा निवडणुकीत मला मोठ्या फरकाने लोकांनी जिंकून दिले. या काळात पक्षात आणि सरकारमध्ये महत्त्वाची पदे भूषविण्याची संधी मला मिळाली. आता राजकारणातून बाजूला झाल्यानंतर पूर्व दिल्लीच्या कृष्णा नगर भागात असलेल्या आपल्या दवाखान्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. कान-नाक-घसा तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवा देण्याचे काम यापुढे करणार आहे.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in