हरयाणात भाजपने भाकरी फिरवली! खट्टर गेले, सैनी आले

हरयाणातील सत्तारूढ भाजप आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बेबनाव निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे सरकार कोसळले. मात्र, भाजपने तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’ करीत...
हरयाणात भाजपने भाकरी फिरवली! खट्टर गेले, सैनी आले

चंदिगड : हरयाणातील सत्तारूढ भाजप आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) यांच्यात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून बेबनाव निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे सरकार कोसळले. मात्र, भाजपने तातडीने ‘डॅमेज कंट्रोल’ करीत नव्या नेत्याची निवड केली आणि कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार व ओबीसी नेते नायबसिंह सैनी यांनी मंगळवारी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राज भवन येथे सायंकाळी हा शपथविधी पार पडला. सैनी यांच्यासह भाजपच्या चार नेत्यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांतच जाहीर होण्याची अटकळ बांधण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

हरयाणा विधानसभेत भाजपचे ४१ आमदार असून पक्षाला सहा अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे, तर उपमुख्यमंत्री दुष्यंतसिंग चौटाला यांच्या नेतृत्वाखालील ‘जेजेपी’चे १० आमदार आहेत. येत्या ऑक्टोबर महिन्यात हरयाणा विधानसभेची निवडणूक होणार आहे.

सैनी यांच्या नेमणुकीमागे ‘ओबीसी’ मतांची समीकरणे

सैनी हे हरयाणातील कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातील खासदार असून इतर मागासवर्ग समाजात (ओबीसी) त्यांचा चांगलाच दबदबा आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात त्यांची हरयाणा भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सैनी हे खट्टर यांचे विश्वासू सहकारी आहेत.

भाजपच्या चार व एका अपक्षाने घेतली मंत्रिपदाची शपथ

नायबसिंह सैनी यांच्यासह आज कन्वरपाल गुज्जर, जयप्रकाश दलाल, मूलचंद शर्मा आणि बनवारी लाल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अपक्ष आमदार रणजितसिंग यांनाही राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. या शपथविधीला माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे उपस्थित होते. तत्पूर्वी, नायबसिंह सैनी यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

आता देशातही बदलाची वेळ - काँग्रेस

हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांना हटवून त्यांच्याऐवजी नायबसिंह सैनी यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने मंगळवारी भाजपवर जोरदार टीका करताना आता देशातही बदलाची वेळ आली असल्याचे म्हटले आहे. हरयाणातील गोंधळाची स्थिती हे भाजपविरुद्ध जनतेच्या मनात तीव्र असंतोष खदखदत असल्याचे प्रतिबिंब असून आता देशातही बदलाची वेळ येऊन ठेपली आहे. हरयाणातील आघाडी तोडणे हे भाजप आणि जेजेपीचे पूर्वनियोजित नाटक होते, असे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in