‘आप’ची सरकारे पाडण्याची भाजपची योजना अयशस्वी; अरविंद केजरीवाल यांचा दावा

‘आप’ची सरकारे पाडण्याची भाजपची योजना अयशस्वी; अरविंद केजरीवाल यांचा दावा

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)मला अटक केल्यानंतर दिल्ली आणि पंजाबमधील ‘आप’चे सरकार उलथून टाकण्याची भाजपची योजना होती

नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी)मला अटक केल्यानंतर दिल्ली आणि पंजाबमधील ‘आप’चे सरकार उलथून टाकण्याची भाजपची योजना होती, मात्र ती यशस्वी झाली नाही, असा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी येथे केला.

आपल्या अटकेनंतर ‘आप’ अधिक एकत्रित आला व मजबूत झाला. दिल्ली आणि पंजाबमधील सरकार उलथून टाकण्यात येईल, असे आपल्या अटकेपूर्वी भाजप म्हणत होता. केजरीवाल यांना अटक करून पक्षात फूट पाडावयाची आणि दिल्ली आणि पंजाबमधील सरकार उलथून टाकावयाचे, अशी भाजपची योजना होती. मात्र, आपल्या अटकेनंतर त्यांची योजना फलद्रूप झाली नाही ती फसली, कारण तुम्ही सर्व जण एकत्र राहिलात, असे केजरीवाल यांनी पक्षाच्या आमदारांना संबोधताना स्पष्ट केले.

आता केजरीवाल यांची गॅरंटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीचा बोलबाला सुरू असतानाच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही रविवारी 'केजरीवाल की गॅरंटी'ची घोषणा केली. इंडिया आघाडीचे सरकार केंद्रात स्थापन झाले तर गॅरंटीमध्ये नमूद केलेली १० कामे युद्धपातळीवर करणार असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. या गॅरंटीमध्ये चीनने कब्जा केलेली भारतीय भूमी मुक्त करण्याचाही समावेश आहे. जनतेने आता मोदी की गॅरंटी आणि केजरीवाल की गॅरंटी यामधून निवड करावयाची आहे. ‘अहोरात्र वीजपुरवठा, चांगले शिक्षण आणि आरोग्य सेवा आणि दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या, अग्निवीर योजना रद्द करू, स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत, चीनने कब्जा केलेली भूमी चीनच्या तावडीतून मुक्त करू, दिल्लीला घटक राज्याच्या दर्जा देऊ, आदींचा केजरीवाल गॅरंटीमध्ये समावेश आहे.

...तर कारागृहात परतावे लागणार नाही!

जनतेने २५ मे रोजी आम आदमी पार्टीची निवड केल्यास आपल्याला पुन्हा कारागृहात परतावे लागणार नाही, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी येथे एका रोड-शोदरम्यान स्पष्ट केले. तुम्ही 'झाडू'ची निवड केली तर पुन्हा कारागृहात परतावे लागणार नाही, अन्यथा २० दिवसांनी आपल्याला कारागृहात परतावे लागेल. जनतेसाठी काम केल्याने त्यांनी कारागृहात टाकले, दिल्लीतील जनतेची कामे होऊ नयेत, असे भाजपला वाटत आहे, असेही केजरीवाल म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in