भाजपचे पुन्हा धक्कातंत्र ;राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा

राजस्थान विधिमंडळ नेतेपदी शर्मा यांची निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला.
भाजपचे पुन्हा धक्कातंत्र ;राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा
PM

जयपूर : मध्य प्रदेश, छत्तीसगडप्रमाणेच राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी चर्चेत नाव नसलेल्या व्यक्तीची निवड करून भाजपने आपल्या ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा धक्का दिला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा यांची निवड भाजपने केली आहे, तर दिया कुमारी सिंह व प्रेमचंद बैरवा यांना उपमुख्यमंत्री बनवले जाणार आहे. वासुदेव देवनानी विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत.

राजस्थान विधिमंडळ नेतेपदी शर्मा यांची निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. विशेष म्हणजे, भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार बनले आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय आहेत. सांगानोर येथून शर्मा हे निवडून आले आहेत. शर्मा यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते सरकार बनवण्यासाठी त्यांनी राज्यपालांची भेट घेतली. भजनलाल शर्मा हे ५६ वर्षांचे असून ते भरतपूरचे राहणारे आहेत. त्यांच्यावर बाहेरचा माणूस असा त्यांच्यावर आरोप होत होता. तरीही त्यांनी सांगानेरहून मोठ्या मताने निवडणूक जिंकली.

राजनाथ यांनी वसुंधराराजे यांची समजूत काढली

या बैठकीपूर्वी राजनाथ सिंह यांनी सर्व ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. राजनाथ सिंह यांनी वसुंधराराजे यांची बैठकीपूर्वीच नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव प्रस्तावित करण्यासाठी समजूत काढली.

राजस्थानचा विकास करू -शर्मा

आमदारांच्या गटात भजनलाल शर्मा हे चौथ्या रांगेत बसले होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. भाजपच्या सर्व नेत्यांबरोबर आपण राजस्थानचा सर्वांगीण विकास करू, असे शर्मा यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in