
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतानाच, चंदिगडमध्ये झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली. भाजपच्या उमेदवार हरप्रीत बाबला यांनी आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या संयुक्त उमेदवार प्रेमलता यांचा पराभव केला. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार हरप्रीत बाबला यांना १९, तर आप-काँग्रेसच्या संयुक्त उमेदवार प्रेमलता यांना १७ मते मिळाली. भाजपच्या हरप्रीत बाबला या दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. याआधी त्या काँग्रेसमध्ये होत्या.
त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या निकालावेळी भाजपकडे फक्त १६ मते होती, पण क्रॉस व्होटिंगद्वारे त्यांना ३ अतिरिक्त मते मिळाली. त्यामुळे विजयाचे पारडे भाजपच्या बाजूने झुकले. या विजयाबद्दल हरप्रीत बाबला यांचे पती देविंदर सिंग बाबला म्हणाले की, “आम्हाला खात्री होती की भाजप या निवडणुकीत विजय मिळवणार आहे. आतापर्यंत विद्यमान महापौर कुलदीप कुमार महानगरपालिकेला लुटत होते. ते फक्त स्वतःसाठी पैसे कमवण्यात व्यस्त होते. त्यांच्या वागण्यावर त्यांचे नगरसेवकही नाराज होते. यामुळेच या लोकांनीही आम्हाला मतदान केले. सध्या क्रॉस व्होटिंग करणारे नगरसेवक आपचे आहेत की काँग्रेसचे हे माहिती नाही. खासदार मनीष तिवारी यांनी निवडणुकीत पहिले मतदान केले.”