शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’; गुंतवणूकदारांना १४ लाख कोटी रुपयांचा फटका, अमेरिकी टॅरिफमुळे जगभरातील शेअर बाजारांत भूकंप

अमेरिकेकडून भारत, चीनसह विविध ६० हून अधिक देशांवर आयात शुल्काची मात्रा लागू करण्यास काही तासांचा कालावधी असतानाच त्याचे नकारात्मक पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटू लागले आहेत.
शेअर बाजारात ‘ब्लॅक मंडे’; गुंतवणूकदारांना १४ लाख कोटी रुपयांचा फटका, अमेरिकी टॅरिफमुळे जगभरातील शेअर बाजारांत भूकंप
Published on

मुंबई : अमेरिकेकडून भारत, चीनसह विविध ६० हून अधिक देशांवर आयात शुल्काची मात्रा लागू करण्यास काही तासांचा कालावधी असतानाच त्याचे नकारात्मक पडसाद जगभरातील शेअर बाजारात उमटू लागले आहेत. सोमवारी व्यवहार सुरू होताच भारतातील प्रमुख शेअर बाजारांनी एकाच सत्रात जवळपास ५ टक्क्यांची आपटी अनुभवली गेली. भारतातील टाटा, अंबानी, अदानींसह बहुतांश बड्या उद्योगसमुहांच्या शेअर्स सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या करवाढीनंतर आणि चीनकडून ‘जशास तसे’ प्रत्युत्तर मिळाल्यानंतर जागतिक बाजारपेठेत झालेल्या पडझडीमुळे आर्थिक मंदीची भीती निर्माण झाली आहे. सोमवारी जगभरातील प्रमुख शेअर बाजार कोसळले. भारतात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकाच व्यवहारात तब्बल २,२२६.७९ अंकांनी आदळला. तर निफ्टीतही जवळपास ३ टक्क्यांची घसरण नोंदली गेली.

मुंबई शेअर बाजारातील ही गेल्या १० महिन्यांतील एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. यापूर्वी, ४ जून २०२४ रोजी सार्वत्रिक निवडणूक निकालादरम्यान शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. सोमवारच्या ‘ब्लॅक मंडे’मुळे मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना १४ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बाजारात सूचिबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य शुक्रवारच्या ४०३ लाख कोटी रुपयांवरून थेट ३९० लाख कोटी रुपयांवर येऊन ठेपले.

बीएसईच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स २,२२६.७९ अंकांनी म्हणजेच २.९५ टक्क्यांनी घसरून ७३,१३७.९० वर स्थिरावला. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. दिवसभरात निर्देशांक ३,९३९.६८ अंकांनी घसरून ७१,४२५.०१ पर्यंत खाली आला होता.

एनएसई निफ्टी ७४२.८५ अंकांनी म्हणजेच ३.२४ टक्क्यांनी घसरून २२,१६१.६० वर स्थिरावला. दिवसभरात निर्देशांक १,१६०.८ अंकांनी घसरून २१,७४३.६५ पर्यंत खाली आला होता.

वर्षभरापूर्वीची कटु आठवण…

यापूर्वी, ४ जून २०२४ रोजी सेन्सेक्स ४,३८९.७३ अंकांनी (५.७४ टक्के) घसरून ७२,०७९.०५ वर बंद झाला होता. दिवसभराच्या व्यवहारात मुंबई शेअर निर्देशांक आधीच्या सत्राच्या तुलनेत ८.१५ टक्क्यांनी घसरला होता. तर ४ जून २०२४ रोजी निफ्टी २१,८८४.५० वर बंद झाला होता. तो या दिवशी १,३७९.४० अंकांनी म्हणजेच ५.९३ टक्क्यांनी घसरला. कामकाज सत्रात तो ८.५२ टक्क्यांनी आपटला होता. तत्पूर्वी, ‘कोविड-१९’ साथीच्या आजारामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली तेव्हा २३ मार्च २०२० रोजी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये एकाच व्यवहारात १३ टक्क्यांहून अधिक घसरण झाली होती.

सोन्याच्या भावात मोठी घट

नवी दिल्ली : ज्वेलर्स आणि स्टॉकिस्ट्सकडून मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने आणि कमकुवत जागतिक कल यामुळे सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव १,५५० रुपयांनी घसरून ९१,४५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. शुक्रवारी, ९९.९ टक्के शुद्धता असलेल्या या मौल्यवान धातूचा भाव ९३,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर होता. सलग पाचव्या दिवशीही घसरणीचा हा क्रम कायम ठेवत चांदीच्या किमती शुक्रवारी ९५,५०० रुपये प्रति किलोवरून ३,००० रुपयांनी घसरून ९२,५०० रुपये प्रति किलो झाल्या. गेल्या पाच सत्रांमध्ये धातूचा भाव प्रति किलो १०,५०० रुपयांनी घसरला होता.

अमेरिकेत महागाई नाहीच - डोनाल्ड ट्रम्प

तेलाचे दर खाली आले आहेत, व्याजदरही कमी आहेत. अन्नधान्याचे दरही किमान आहेत. याचा अर्थ अमेरिकेत महागाईच नाही, असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले. अमेरिकेतील शेअर बाजारात सातत्याने पडझड होत असताना ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करावी, अशी सूचना केली. अमेरिकेच्या ‘फेडरल ओपन मार्केट कमिटी’ची बैठक ६-७ मे रोजी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in